कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:55 IST2025-01-09T15:53:24+5:302025-01-09T15:55:14+5:30
अंमलबजावणी हाेणे आवश्यक

कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही
कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेली एअरविंग एनसीसी सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून खुद्द केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, गेल्या अकरा वर्षांपासून चर्चेत असलेले एअरविंग पुन्हा आश्वासनाच्या उड्डाणात अडकणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोल्हापुरात १९६० पासून एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर सुरु आहे. याठिकाणी २१ हजार कॅडेट आहेत. आर्मीचे ८ व नेव्हीचे १ युनिट कार्यरत आहे. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र एअरफोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोल्हापुरात एअरविंग एनसीसीचे हेडक्वार्टर सुरू व्हावे, यासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार संभाजीराजे व दादूमामा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर देसाई यांनी वारंवार पाठपुरावा केला.
त्यानुसार विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरविमानतळ येथे एअरविंग एनसीसीसाठी २.३५ एकर जागा ३० वर्षांच्या करारावर देण्यास मंजुरी दिली. विमानतळ प्राधिकरण व मुंबई एव्हिएशन अकॅडमी यांच्यात करारही झाला. मात्र, पुढे यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या केंद्राचे भिजत घोंगडे पडले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री मोहोळ यांनी कोल्हापूरला एअरविंग एनसीसी सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
सतेज पाटील यांचा पाठपुरावा
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना करिअरची नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारी एअरविंग एनसीसी कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरू करावी, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ३ ऑगस्ट २०२३ ला विधानपरिषदेत मांडला होता. यावर मंत्री संजय बनसोडे यांनी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले होते. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर एअरविंगसाठीच्या जागेला सप्टेंबर २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आली.
गेल्या अकरा वर्षांपासून मी कोल्हापुरात एअरविंग एनसीसी कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये सुरू करावी, यासाठी पाठपुरावा करत आहे. पण त्याचे गांभीर्य कुणाला नाही. - मुरलीधर देसाई, माजी वायु सैनिक, कोल्हापूर.