मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 14:02 IST2019-08-09T14:02:29+5:302019-08-09T14:02:58+5:30
हेरले परिसरातील अनेक तरूण मंडळांनी पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे.

मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा'
हेरले/कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक तिसऱ्या दिवशीही बंद राहिल्यामुळे या अडकलेल्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना हेरले आणि परिसरातील ग्रामस्थांनी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली. महापुरामुळे हेरले परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हालोंडी येथील आशीर्वाद मंगल कार्यालय, मौजे वडगाव, नागाव येथील शाळा पूरग्रस्तांसाठी खुल्या करण्यात आल्या असून, तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेरले परिसरातील अनेक तरूण मंडळांनी पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे. आज, सलग तिसऱ्या दिवशी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ज्या ठिकाणी यापूर्वीच कधीच पुराचे पाणी आले नाही, तेथेही पाणी आले आहे. माजी सभापती राजेश पाटील,जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पंचायत समीती सदस्या महेरनिगा जमादार, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच विजय भोसले, माजी सरपंच बालेचाँद जमादार, आदर्श ग्रुप संग्राम मित्र मंडळ, सावली ग्रुप, आझाद ग्रुप, श्री बिस्कीट, भगवा रक्षक, कम ऑन इंडिया, शिवसेना हेरले, फायटर ग्रुप, जयकीर्ती मित्र मंडळ, शांतीसागर मित्र मंडळ, परमाज गल्ली, बौध समाज हेरले, महालक्ष्मी नवरात्र उत्सव समिती यांच्या मार्फत महामार्गावर मदत पोहोचवण्यात भाग घेतला. हेरले अरिहंत ग्रुपमार्फत शिरोळ येथील पूरग्रस्तांना तसेचशिरोली येथील एनडीआरएफच्या जवान आणि पोलीसांच्या जेवणाची सोय केलेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे मदतकार्य सुरू आहे.