Kolhapur: पन्हाळगडावर ताराबाई यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, आमदार विनय कोरे यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:33 IST2024-12-24T17:32:47+5:302024-12-24T17:33:07+5:30
पन्हाळ्यात मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेची सांगता

Kolhapur: पन्हाळगडावर ताराबाई यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, आमदार विनय कोरे यांनी केली घोषणा
पन्हाळा : पन्हाळगडावर मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई यांचा अश्वारूढ पुतळा व चित्र दालन उभारणार असल्याची घोषणा आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पन्हाळगडावर महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई विद्वत परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी हेरिटेज वॉकने झाली. यावेळी मोडी व इतिहास अभ्यासक अमित अडसूळ यांनी गडावरील महत्त्वपूर्ण ठिकाणांचा इतिहास व परिपूर्ण माहिती दिली. शाहीर दिलीप सावंत व तृप्ती सावंत आणि सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला.
इतिहास अभ्यासक राम यादव यांनी महाराणी ताराबाई आणि राजर्षी शाहू महाराज या विषयावर विचारमंचाला पुष्प वाहिले. त्यानंतर व्याख्यात्या डॉ. पूनम पाटील भुयेकर यांनी राजमाता जिजाऊंचा सक्षम वारसा ताराबाई या विषयावर, व्याख्यात्या-डॉ. देविकारणी पाटील यांनी इतिहास संशोधक, महाराणी ताराबाई यांची चरित्र साधने या विषयावर व व्याख्यात्या लेखिका स्वपमजा घाटगे, यांनी महाराणी ताराबाई आणि महिला सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान दिले.
परिषदेची सांगता आमदार डॉ. विनय कोरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या उपस्थितीत झाली. संयोजक किरणसिंह चव्हाण यांची परिषदेमार्फत घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी इंद्रजित सावंत यांनी महाराणी ताराबाई यांच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला जगासमोर आणण्यासाठी संग्रहालय व दालनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. आमदार विनय कोरे यांनी ताराबाईंचा इतिहास नव्या रूपाने मांडण्याची गरज असून पन्हाळगडावर ताराबाईंचा पुतळा उभारण्याची मागणी मान्य केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत महाराणी ताराबाई यांच्यावर झालेल्या संशोधनाची माहिती दिली.
यावेळी मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, माधव गुळवणी, जीवन उर्फ बंडा पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल काशीद यांनी केल. अमित अडसूळ यांनी आभार मानले.