आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:17 IST2025-03-29T12:16:03+5:302025-03-29T12:17:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान ...

आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव
कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान कंपनीने तयारी दर्शविली असून, लवकरच हा प्रस्ताव ही कंपनी विमानतळ प्राधिकरणाला पाठवणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर कोल्हापूरकरांची मोठी सोय होणार आहे.
सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरू आहे. मात्र, त्याची वेळ तितकीशी सोयीची नाही. एका दिवसात मुंबईला जाऊन काम संपवून पुन्हा त्याच विमानाने परत येणे शक्य होत नाही. ही नामांकित विमान कंपनी सकाळी व सायंकाळी अशी दोनवेळा सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन आहे.
दिवसातून दोनवेळा मुंबईला जाण्यासाठी विमान असेल तर येथील उद्योजक, व्यावसायिक यांना सकाळच्या विमानाने मुंबईला जाऊन काम आटोपून पुन्हा रात्री कोल्हापुरात येता येणार आहे. विशेष म्हणजे हीच कंपनी एअरबस विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे एअरबस विमान १८५ प्रवासी क्षमतेचे असून, त्याचा वेगही प्रचंड असतो. ही सेवा सुरू झाल्यास तिकीटदरही कमी होणार आहेत.
मुंबई, पुण्याची विमाने पार्किंगसाठी कोल्हापुरात
मुंबई, पुण्यातील विमानतळे नेहमीच प्रचंड व्यस्त असतात. त्यामुळे खासगी विमाने कुठे पार्क करायची ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर ही खासगी विमाने पार्क करता येतील का याची चाचपणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला आणखी जमीन संपादित करावी लागणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर विमानतळ प्राधिकरणाला पार्किंगच्या भाडे रूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. शिवाय खासगी विमानांच्या पार्किंगचा प्रश्नही निकालात निघेल.