Kirnotsav २०२५: पूर्ण क्षमतेने झाला अंबाबाईचा किरणोत्सव, सूर्यकिरणे मूर्तीच्या किरिटापर्यंत-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:24 IST2025-11-10T19:23:14+5:302025-11-10T19:24:18+5:30
किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात आज, सोमवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या मुखकमलावर आली एक मिनीटभर चेहऱ्यावर स्थिरावून किरिटावर जाऊन लुप्त झाली. अशा रीतीने या वर्षीचा अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला.
अंबाबाईच्या किरणोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी किरणे खांद्यापर्यंत, दुसऱ्या दिवशी कानापर्यंत आली होती. तिसऱ्या दिवशी आज, सोमवारी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर आली, अगदी किरिटापर्यंत लुप्त झाली. पूर्ण क्षमतेने होत असलेला किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. देवीची आरती होताच, भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला.
यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.मिलिंद कारंजकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.