Kolhapur News: अंबाबाईचा किरणोत्सव रविवारपासून, उद्यापासून चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:41 IST2025-11-06T17:41:07+5:302025-11-06T17:41:29+5:30
मावळतीची सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात

संग्रहित छाया
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला रविवारपासून (दि. ९) प्रारंभ होत आहे. किरणोत्सवाच्या ठरलेल्या तारखांच्या आधी व नंतरदेखील हा साेहळा होत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने उद्या शुक्रवारपासूनच याची चाचणी केली जाणार आहे.
अंबाबाईचा वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी आणि ९ ते ११ नोव्हेंबर अशा या किरणोत्सवाच्या तारखा आहेत. याकाळात महाद्वारातून आलेली मावळतीची सूर्यकिरणे थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात. अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श, कमरेपर्यंत आणि अखेरीस किरणे देवीच्या चेहऱ्यावर येऊन किरणोत्सवाचा सोहळा पूर्ण होतो.
मात्र या ठरलेल्या तीन दिवसांच्या आधी व नंतरदेखील किरणाेत्सव होत असल्याने दोन दिवस आधी व दोन दिवसांनीदेखील चाचणी केली जाते. त्यामुळे आज गुरुवार किंवा उद्या शुक्रवारपासूनच किरणोत्सवाची चाचणी केली जाणार आहे.