Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:18 IST2025-09-18T13:18:10+5:302025-09-18T13:18:40+5:30
जोतिबा आराखड्याला मंजुरी

Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याचे अंदाजपत्रक पुरातत्व खात्याच्या तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. तर जोतिबा मंदिर आराखड्याच्या अंदाजपत्रकाला याआधीच मान्यता मिळाली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत अंबाबाई आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर दाेन्ही कामांची निविदा प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, अंबाबाई मंदिर आराखड्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत जतन, संवर्धन व सुधारणांचा समावेश आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करून ते पुरातत्व विभागाला तांत्रिक मान्यतेसाठी सादर झाले आहे. जोतिबा आराखडा याआधीच सादर झाला होता. त्यात विभागाने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित बदल व दुरुस्ती करून या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आहे. अंबाबाई आराखड्याच्या अंदाजपत्रकालादेखील पुढील आठ-दहा दिवसांत मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे. ते होताच दोन्ही मंदिरांचे आराखडे राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून निविदा प्रक्रिया केली जाईल.
भूसंपादन पर्यायाचा अहवाल समितीला सादर
अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यात तसेच पुढील टप्प्यामध्ये मिळकतींचे संपादन करावे लागणार आहे. त्यासाठीची नुकसानभरपाई कोणत्या स्वरुपात देता येईल याबाबतच्या पर्यायांचा अहवाल नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या समितीपुढे सादर केला आहे. बाधितांचे पुनर्वसन, नुकसानभरपाईची रक्कम यासह वेगवेगळे पर्याय मांडले आहेत.
बैठकीनंतरच नागरिकांशी चर्चा
जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी दिलेल्या पर्यायांवर अपर मुख्य सचिवांच्या समितीची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांशी चर्चा केली जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.