Kolhapur Dussehra: पैसे नाहीत हातात अन् म्हणे दसरा महोत्सव करा थाटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:37 IST2025-09-16T13:37:35+5:302025-09-16T13:37:51+5:30
उधारीवर साजरा करण्याचे प्रशासनाचे नियोजन

Kolhapur Dussehra: पैसे नाहीत हातात अन् म्हणे दसरा महोत्सव करा थाटात
कोल्हापूर : कोल्हापूरच्यादसरा महोत्सवाचा राज्य महोत्सवाच्या यादीत समावेश झाला असला तरी शासनाकडून अजून निधीची तरतूद झालेली नाही. निधी येण्याची गोष्ट तर खूप लांबची गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने या महोत्सवासाठी दोन कोटींची तरतूद केली होती. सध्या फक्त दोन लाख रुपये हाताशी असल्याचे सांगण्यात येते. जर निधीच नसेल तर दसरा महोत्सव करायचा कसा, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.
जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या काळात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या पुढाकारातून दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. त्यावेळी केसरकर यांनी नवरात्रौत्सवातील कार्यक्रमांसाठी व शाही दसरा सोहळ्याच्या भव्यदिव्यतेसाठी दोन कोटींची तरतूद केली होती. तेव्हापासून हा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. मात्र, मागील वर्षी विधानसभा निवडणुकांमुळे विविध योजनांसाठी शासनाला कोट्यवधी रुपये खर्चावे लागल्याने आता तिजोरीत ठणठणाट आहे.
मागील आठवड्यात राज्य शासनाने कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाचा समावेश राज्यातील प्रमुख महोत्सवांच्या यादीत तसेच दिनदर्शिकेत केला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रयत्नाला यश आले असले तरी दसरा महोत्सव यशस्वी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. शासनाने राज्य महोत्सवाच्या यादीत कोल्हापूरच्या शाही दसऱ्याच्या समावेशाची घोषणा केली आहे, मात्र तो साजरा करण्यास पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही तर जिल्हा प्रशासनाला टीकेलाही सामोरे जावे लागणार आहे.
निधीची तरतूद करणे ही जिल्हा प्रशासनासाठी तशी अवघड बाब नाही. नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीमधूनदेखील तरतूद करता येते. पण, सध्या तरी प्रशासनाच्या गाठीशी निधी नाही एवढे खरे.
दर्जेदार, चांगल्या महोत्सवासाठी प्रयत्न
शासनाकडून निधी येईल तेव्हा येईल; पण दसरा महोत्सव दर्जेदार आणि चांगला व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. सध्या तरी उधारीवर का असेना महोत्सव साजरा केला जाणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात रोज दसरा महोत्सव समितीच्या बैठका होऊन कार्यक्रमांची यादी अंतिम केली जात आहे.