गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..वाचा
By राजाराम लोंढे | Updated: March 12, 2026 12:34 IST2026-03-12T12:29:04+5:302026-03-12T12:34:08+5:30
बंद युनिट चालू करण्यासाठी धांदल

गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..वाचा
राजाराम लोंढे
कोल्हापूर : इराण-इस्त्रायल युद्धामुळे एलपीजी गॅस टंचाईने शहरातील नागरिक हैराण असले, तरी ग्रामीण भागात घरोघरी सुरू असलेले बायोगॅसमुळे मुबलक गॅस मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार युनिट कार्यान्वित झाली आहेत. त्यातून मिळणारा गॅस हा एलपीजी गॅसला सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. ज्यांचे हे युनिट बंद होती, त्यांची दुरुस्तीसाठी धांदल उडाल्याचे दिसते.
केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वन वर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने अतिशय प्रभावीपणे बायोगॅस योजना राबवल्याने देशात सर्वाधिक बायोगॅसची बांधणी कोल्हापूरात झाली आहे. यासाठी शासनाने ३४२ कोटी ३० लाख रुपये अनुदानाच्या रुपाने ग्रामीण कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे.
सध्या युद्धामुळे एलपीजी गॅसची टंचाई भासू लागल्याने शहरी भागातील नागरिक काहीसे हवालदिल झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात गॅस टंचाईच्या कालावधीत बायोगॅस आधार ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी बांधलेली पण ना दुरुस्त असलेली बायोगॅस सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात काहीशी धांदल उडाल्याचे दिसते.
वाचा: कोल्हापुरात सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती १५०० तर व्यावसायिक २५०० रुपये चढ्या दराने विक्री
गरज असेल, तरच गॅस
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात अजूनही चूल आहेच. चुलीला पर्याय म्हणून बायोगॅस असतो. बायोगॅस नसेल तर ‘एलपीजी’ गॅस असले, तरी अचानक स्वयंपाक करायचा असेल किंवा घरी पाहुणे आले, तरच हा गॅस पेटतो.
‘गोकुळ’कडून ९ हजार युनिट
‘गोकुळ’ दूध संघाच्या माध्यमातून सिस्टीमा बायाेगॅसच्या सहकार्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ‘समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस’ची ९ हजार युनिट दिली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती होत आहे.
अकरा गावांत १०० टक्के बायोगॅस
महालवाडी (भुदरगड), माेरेवाडी (चंदगड), हेळेवाडी (गडहिंग्लज), फराकटेवाडी (कागल), कुंभारवाडी व महाडीकवाडी (पन्हाळा), कातळेवाडी (शाहूवाडी), मोरेवाडी (आजरा), चौधरवाडी (गगनबावडा), निलेवाडी (हातकणंगले), शेळकेवाडी (करवीर), बरगेवाडी (राधानगरी)