कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचे वितरण आज, गुरुवारी विद्यार्थ्यांना करण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील विविध शाळांमधून गुणपत्रके नेण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी शाळांचे परिसर फुलले होते. शाहू जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली असताना देखील गुणपत्रिकांचे वाटप करण्यासाठी मात्र, शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.दहावीचा ‘आॅनलाईन’ निकाल १७ जूनला जाहीर झाला. या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून १ लाख ४२ हजार ४८८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १ लाख ३३ हजार ६९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे आज सकाळी अकरा वाजता वितरण केंद्रांवरून जिल्ह्यातील शाळांना गुणपत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर संबंधित शाळांमध्ये दुपारी तीननंतर गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले. शाळांमध्ये गुणपत्रिकेसह दाखला देखील देण्यात आला. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. उत्साही विद्यार्थी एकमेकाला गळाभेट देऊन आनंद वाटून घेत होते. तसेच भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देत कोणते करिअर निवडणार याची देवाण-घेवाण करीत होते. काही विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी शाळेत आले होते. सुटी असूनदेखील शाळांचा परिसर गर्दीने फुलला होता. काही खासगी शैक्षणिक संस्थांनी शहरातील विविध शाळांच्या परिसरात आपल्या अभ्यासक्रमांची माहिती देणारे स्टॉल थाटले होते. (प्रतिनिधी)
दहावीचे गुणपत्रक वाटप : शाळा गर्दीने फुलल्या; दाखलाही दिला
By admin | Updated: June 27, 2014 01:19 IST