कोल्हापूर जिल्ह्यातील धरणालगतच्या सर्वच अनधिकृत फार्महाऊसची तपासणी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By उद्धव गोडसे | Updated: May 7, 2025 17:24 IST2025-05-07T17:23:30+5:302025-05-07T17:24:04+5:30
पाटबंधारे विभागाकडून फार्महाऊस मालकांना नोटिसा, कारवाई होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणालगतच्या सर्वच अनधिकृत फार्महाऊसची तपासणी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
उद्धव गोडसे
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वच तलाव आणि धरणांच्या जलाशयालगत झालेल्या अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी विविध विभागांना दिले. नियमबाह्य बांधकामे करून जलाशयांना धोका निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. पाटबंधारे विभाग, जलसंधारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
अणदूर धरणातील दुर्घटनेनंतर 'लोकमत'ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये धरणालगत झालेल्या बांधकामांची वस्तुस्थिती समोर आली. शासकीय नियमांमधील पळवाटांचा आधार घेऊन थाटलेले फार्महाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेल्समुळे जलाशयांना निर्माण झालेला धोका स्पष्ट झाला. हा धोका जिल्ह्यातील सर्वच जलाशयांना असल्याने याबद्दल वेळेची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'अणदूर धरण दुर्घटनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच तलाव, धरणे आणि जलाशयांच्या सुरक्षेसाठी प्रश्न चर्चेत आला आहे. पाणलोट क्षेत्रातील आणि जलाशयांच्या सुरक्षेला धोकादायक असलेल्या अतिक्रमणांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश जलसंधारण, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर नियमबाह्य बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही जलाशयाचा गैरवापर होऊ नये, तसेच तिथे प्रदूषण होऊ नये याला प्राधान्य दिले जाईल.'
पाटबंधारे विभागाकडून नोटिसा
पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील जलाशयांलगत असलेले सर्व फार्महाऊस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांना तातडीने नोटिसा पाठविल्या आहेत. बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा उठाव याबद्दल नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या
पोहणे आणि बोटिंगची परवानगी नसलेल्या जलाशयांजवळ सूचना फलक लावणे आणि सुरक्षारक्षकांची गस्त वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेऊन हुल्लडबाजांना शिस्त लावावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्रुटींची दुरुस्ती करू ; फार्महाऊस मालकांची ग्वाही
अणदूर येथील फार्महाऊस ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी 'लोकमत'च्या कार्यालयात येऊन त्यांची बाजू मांडली. पाटबंधारे विभागाच्या निकषांनुसार काही त्रुटी राहिल्या असल्यास त्याची दुरुस्ती करू. प्रदूषण आणि हुल्लडबाजी होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. निसर्गाची जपणूक करून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच वेदांतिका माने यांचा प्लॉट त्यांनी दहा वर्षांपूर्वीच महेश भोसले यांना विकला आहे. ग्रामपंचायतीकडे जुन्याच नावांची नोंद असल्याने त्यांचे नाव यादीत आल्याचे ओनर्स असोसिएशनने सांगितले.