Kolhapur ZP Election: महायुतीच्या पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा, जोडण्या सुरु; आघाडीतून कोणाची नावे चर्चेत...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:46 IST2025-10-15T11:46:31+5:302025-10-15T11:46:52+5:30
पर्यायी मतदारसंघांची चाचपणी सुरू, दिवसभर राजकीय चर्चांना ऊत

Kolhapur ZP Election: महायुतीच्या पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा, जोडण्या सुरु; आघाडीतून कोणाची नावे चर्चेत...जाणून घ्या
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महायुतीच्या तीनही पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा असून, त्यासाठीच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेले १९ मतदारसंघ चर्चेत आले आहेत. ज्यांची आरक्षणामुळे कोंडी झाली आहे अशांनीही मंगळवारी दिवसभरामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.
जेव्हा अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले तेव्हापासूनच पुन्हा शौमिका महाडिक यांच्या नावाची भाजपच्या गोटातून चर्चा सुरू झाली. परंतु, त्यांचा पुलाची शिरोली मतदारसंघ इतर मागाससाठी आरक्षित झाल्याने त्या इतर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी कळंबा, ता. करवीर आणि कुंभोज, ता. हातकणंगले हे मतदारसंघ त्यांच्यासाठी साेयीचे असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. एकदा हे पद भूषविल्यानंतर त्या पुन्हा रिंगणात उतरणार आहेत का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघातील अनेक गट हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. खुद्द त्यांच्या भावजय आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी रोहिणी या पिंपळगाव मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्या पुन्हा येथून रिंगणात उतरू शकतात. शिंदेसेनाही अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार असल्याने रोहिणी यांचे नाव पुढे येऊ शकते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेदेखील आपल्या मतदारसंघात अध्यक्षपद मिळावे यासाठी जोडण्या घालायला मागे पडणार नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील गिजवणे, चिखली, बोरवडे हे मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील, मनोज फराकटे यांच्या पत्नी रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह राहू शकतो.
महाविकासकडे सध्या पाटील, देसाई आघाडीवर
महाविकास आघाडीकडून सध्याच्या घडीला शिंगणापूर येथून रिंगणात उतरणाऱ्या माजी शिक्षण सभापती रसिका अमर पाटील आणि गारगोटीतून रिंगणात उतरण्याची शक्यता असलेल्या माजी आमदार बजरंग देसाई यांच्या स्नुषा माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा राहुल देसाई यांची नावे चर्चेत आहेत. आमदार सतेज पाटील करवीर तालुक्याला समोर ठेवून काही निर्णय घेतील असे बोलले जाते.
वहिनींचा फोटो काढून ठेवा
मतदारसंघ बदलून अनेक ठिकाणी महिला आरक्षण झाल्याने आता ‘भाऊ’, ‘दादा’ यांच्याऐवजी आता ‘ताई’ आणि ‘वहिनी’ रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे दादा, भाऊंचे कडक इस्त्रीतील फोटो बाजूला लावावे लागणार असून, आता ताई, वहिनींचे फोटो काढावे लागणार आहेत. दादा, भाऊंच्या समाजकार्यात ताई, वहिनींचा वाटा, समर्थ साथ कशी होती याच्यासाठीही माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली असून, आता महिला आरक्षित ३४ मतदारसंघांतील प्रचार पतीराजांनी आधी केलेल्या कामाच्या आधारावरच होणार आहे.