Ichalkaranji Municipal Election 2026: ‘मविआ’सह स्थानिक आघाड्यांची ‘शिव-शाहू विकास आघाडी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:42 IST2025-12-20T15:40:00+5:302025-12-20T15:42:25+5:30
मूळ प्रश्नांना भाजपने बगल दिल्याचा आरोप, प्रकाश आवाडे रिकामे आहेत

Ichalkaranji Municipal Election 2026: ‘मविआ’सह स्थानिक आघाड्यांची ‘शिव-शाहू विकास आघाडी’
इचलकरंजी : महाविकास आघाडीसोबत सर्व घटकपक्ष एकत्र येऊन ‘शिव-शाहू विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आवळे म्हणाले, ‘कोणतीही ताकद पुढे असू द्या, आम्ही शहराच्या विकासासाठी लढणार आहोत. माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, मूळ प्रश्नाकडे बगल देण्याचे काम भाजपने केले आहे. मदन कारंडे म्हणाले, शहराला परिवर्तनाची गरज आहे असून चर्चा सुरू झाली आहे.’ सागर चाळके म्हणाले, ‘या निवडणुकीत एकजूट दाखविण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.’
शशांक बावचकर म्हणाले, ‘महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मॅँचेस्टर आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, लाल निशाण हे सर्व पक्ष शिव-शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक लढविताना व्यापकता असावी, समन्वय राहावा, एकच चिन्ह असावे, यासाठी या आघाडीची स्थापना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश मोरबाळे यांनी या निवडणुकीसाठी कप-बशी, शिट्टी व गॅस सिलिंडर या चिन्हांची मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी सदा मलाबादे, मलकारी लवटे, रवी गोंदकर, अब्राहम आवळे, भरमा कांबळे, प्रमोद खुडे, सुनील बारवाडे, हेमंत वणकुंद्रे, आदी उपस्थित होते.
संजय कांबळे एकनिष्ठ
काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर असल्यासंदर्भात शशांक बावचकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कांबळे कुटुंबीय हे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. काल सायंकाळपर्यंत ते आमच्यासोबत होते. ते दुसऱ्या पक्षात जातील, असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले नाही. एखाद्याच्या नावावर पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित करणे योग्य नाही.
प्रकाश आवाडे रिकामे आहेत
माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सध्या रिकामे आहेत. त्यांच्या रिकाम्या डोक्याला काम नाही. त्यामुळे अन्य पक्षांतील माणसे फोडण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार राज्यभर सुरू आहे. परंतु आम्ही असे फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. गावातील धार्मिक, सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी जो सोबत येईल, त्याला सोबत घेऊन काम करणार असल्याचे शशांक बावचकर यांनी सांगितले.