कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वच पक्षांना स्वतंत्रपणे लढण्याची खुमखुमी, राजकीय हालचाली गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:22 IST2025-05-08T17:21:50+5:302025-05-08T17:22:16+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी , महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची, याची सर्वच घटक ...

All parties are keen to contest Kolhapur Municipal Corporation independently | कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वच पक्षांना स्वतंत्रपणे लढण्याची खुमखुमी, राजकीय हालचाली गतिमान

कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वच पक्षांना स्वतंत्रपणे लढण्याची खुमखुमी, राजकीय हालचाली गतिमान

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी, महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची, याची सर्वच घटक पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना, उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी जेथे समझोता शक्य आहे तेथे एकत्र लढावे आणि जेथे शक्य नाही तेथे मैत्रिपूर्ण लढावे, अशी सावध भूमिका घेतली आहे. परंतु चाचपणीनंतर सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते यासंबंधीचा निर्णय घेणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांनी स्वतंत्र लढविलेल्या आहेत. राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-शिवसेना एकत्र हाेते; त्यामुळे आपापसात सामंजस्य, योग्य समन्वय राखत महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ-आमदार सतेज पाटील एकत्र होते. त्यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, ताराराणी आघाडीचे महादेवराव महाडिक एकत्र होते. खासदार धनंजय महाडिक यांचीही छुपी मदत भाजप-ताराराणी आघाडीला मिळाली. त्यावेळी सहा-सात जागा कमी मिळाल्याने भाजपचे महापालिकेतील सत्ता मिळविण्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१५च्या निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या. फोडाफोडीचे राजकारण घडू नये म्हणून शिवसेनेशी सत्तेची पदे देण्याचा समझोता करून त्यांच्या ४ नगरसेवकांनाही आपल्या आघाडीत घेतले. त्यामुळे पाच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता राखली. परंतु त्यानंतरही भाजप-ताराराणी आघाडीने महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न सोडलेले नाही.
२०२२ मध्ये घडलेल्या राज्यातील घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील परिणाम झाला.

शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र पक्ष झाले. कार्यकर्ते, नगरसेवक विभागले गेले. सध्या भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेना आहे. चार महिन्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत सोबती बदलले आहेत, नेते बदललेले आहेत. त्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यावी, याचा अंदाज नसल्याने एकत्र लढायचे की स्वतंत्र, याची चाचपणी सुरू झाली आहे.

कोण कोणासोबत असेल?

महाविकास आघाडी- आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले.

महायुती- मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, आदिल फरास, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील

Web Title: All parties are keen to contest Kolhapur Municipal Corporation independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.