Kolhapur: ४५ दिवसांत दामदुप्पट परताव्याचे आमिष; ३०० कोटींचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

By उद्धव गोडसे | Published: March 16, 2024 05:59 PM2024-03-16T17:59:25+5:302024-03-16T17:59:44+5:30

सान्विक वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख अक्षय कांबळे अटकेत, दोन वर्षांपासून होता फरार

Akshay Kamble of Kolhapur arrested for defrauding Rs 300 crores by promising double return in 45 days | Kolhapur: ४५ दिवसांत दामदुप्पट परताव्याचे आमिष; ३०० कोटींचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

Kolhapur: ४५ दिवसांत दामदुप्पट परताव्याचे आमिष; ३०० कोटींचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

कोल्हापूर : सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून ४५ दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा भामटा अक्षय अनिल कांबळे (वय २९, रा. सादळे, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १६) त्याच्या घरातून अटक केले. कांबळे याच्यावर जिल्ह्यात चार पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, तो दोन वर्षांपासून फरार होता. त्याचे कुटुंबीय आणि अन्य साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.

बी.कॉम.चे शिक्षण घेतलेला अक्षय कांबळे हा फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत आणि गोव्यातील काही कॅसिनोमध्ये पैसे गुंतवत होता. त्यातून मोठा नफा मिळत असल्याचे सांगून त्याने इतर लोकांना पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले. गुंतवणुकीचा ओघ वाढताच त्याने २०१९ मध्ये सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील अयोध्या टॉवरमध्ये कार्यालय थाटले. आई, पत्नी यांच्यासह इतर नातेवाईकांच्या नावावर इतर कंपन्या सुरू करून त्याद्वारे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये जमा केले. छोट्या रकमांचा दुप्पट परतावा दिल्याने हुरळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी स्थावर, जंगम मालमत्ता विकून वेल्थमध्ये पैसे भरले.

मात्र, २०२२ मध्ये कंपनीला टाळे ठोकून अक्षय कांबळे पळून गेला. त्याच्यावर शाहूपुरी, गोकुळ शिरगाव, मुरगुड आणि मिरज पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चार पोलिस ठाण्यांतील पोलिसांची नजर चुकवून तो दोन वर्षांपासून फरार होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या त्याच्या मुसक्या आवळल्या.

निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह उपनिरीक्षक शेषराज मोरे, अंमलदार बालाजी पाटील, अशोक पाटील, आदींच्या पथकाने अटकेची कारवाई केली. पुढील तपासासाठी कांबळे याचा ताबा गोकुळ शिरगाव पोलिसांकडे देण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पूर्ण कुटुंबाचा फसवणुकीत सहभाग

अक्षय कांबळे याने त्याच्या नातेवाईकांच्या नावे काही कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याद्वारे त्याने लोकांची फसवणूक केली. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला पळून जाण्यास आणि बाहेर लपून राहण्यास कुटुंबीयांनी मदत केली. यामुळे कांबळे कुटुंबावरही कारवाई होणार असल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.

Web Title: Akshay Kamble of Kolhapur arrested for defrauding Rs 300 crores by promising double return in 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.