आजरा पोलिसांनी १२ लाख ८९ हजारांची पकडली गोवा बनावटीची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:36 IST2021-05-21T15:34:12+5:302021-05-21T15:36:43+5:30
Crimenews liquor ban Police : गोव्यात कांदा विक्री करून आयशर टेम्पोतून १२ लाख ८९ हजार ५२८ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या बीडच्या दोघांना आजरा पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.

आजरा पोलिसांनी १२ लाख ८९ हजारांची पकडली गोवा बनावटीची दारू
सदाशिव मोरे
आजरा : गोव्यात कांदा विक्री करून आयशर टेम्पोतून १२ लाख ८९ हजार ५२८ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या बीडच्या दोघांना आजरा पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.
खय्युमपठान अब्बास खान व रामदेवराव नलवडे यांनी चालकाच्या केबिनच्या मागे दारू ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा केला आहे. त्यामधून दारूची वाहतूक केली जात होती. रात्री गवसे चेक पोस्टला पोलीसांना शंका आली म्हणून टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांनी मॅकडॉल व्हिस्कीचे ३ लाख ५९ हजार ४२४ रुपयांचे ११७ बॉक्स, इंपिरियल ब्लू ग्रीन व्हीस्कीचे १ लाख ७५ हजार १०४ रुपये किमतीचे ५७ बॉक्स, चॉकलेटी रंगाचा ७ लाख ७५ हजार किंमतीचा आयशर टेम्पो, ओपो कंपनीचा ५ हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण १२ लाख ८९ हजार ५२८ रुपयांचा माल जप्त केला आहे.
कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहाय्यक फौजदार नाथा पाटील, पो.हे.कॉ. दत्ता शिंदे, अमर आडसोळ, अमोल पाटील, सुनील कोइंगडे, विशाल कांबळे यांच्या पथकाने केली.
कोरोना रोगाच्या साथीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या कर चुकून गोव्यातून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी गोवा बनावटीची दारु आणली म्हणून आजरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.