ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:11 IST2022-12-17T13:10:38+5:302022-12-17T13:11:02+5:30
जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार चार जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह सर्व पोलिस ठाण्यांकडून गेल्या १५ दिवसांत कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ४९ लाख ६३ हजार १६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात व काेणताही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस विशेष मोहीम राबवून धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी जिल्हाभरात मटका जुगाराचे ४५ गुन्हे नोंद करीत ५ लाख ६६ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार जुगार क्लबवर छापे टाकून ८ लाख १४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणी कारवाई करीत ७ लाख ९४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नाश केला.
अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या ११६ जणांवर कारवाई करून २७ लाख ८७ हजार ०३१ रुपयांचा माल जप्त केला. दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगल्याप्रकरणी ४५ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. तडीपार असलेल्या पाच जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. याशिवाय बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले. हव्या असलेल्या संशयितांना पकडण्यात यश आले. दरम्यान, जिल्ह्यात ७५० वाॅरंटची बजावणी करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली.