Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:25 IST2025-01-03T12:24:59+5:302025-01-03T12:25:34+5:30

कोल्हापूर : विशाळ गडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर ...

After the riots at Vishalgarh, the economy came to a standstill as the government imposed direct restrictions on tourism here | Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

Kolhapur: विशाळगडावरील पर्यटन बंदीमुळे गावकरी मिठालाही महाग, मुख्यमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर : विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर सरकारने थेट निर्बंध लादल्याने ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. पर्यटनावर सुरू असलेली विशाळगडावरची अर्थव्यवस्था थांबली असून, गावकरी मिठालाही महाग झाले आहेत, त्यामुळे विशाळगडावरची स्थिती पूर्ववत करा, असे आर्जवच येथील ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. एका सजग नागरिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विशाळगडप्रकरणी आता सरकारने भूमिका घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

पत्रात म्हंटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आमच्या गावचे पर्यटन पूर्णपणे बंद आहे. दि. १४ जुलै रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर गावात सामान्य रहिवाशांचे जीवन दयनीय झाले आहे. आमचे इतिहासकालीन गाव, आमच्या अनेक पिढ्या येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमचे गाव हिंदू-मुस्लीम एकोप्याचे प्रतीक आहे. आम्ही शिवजयंती, ऊरुस, गणेशचतुर्थी, मोहरम, रामनवमी एकत्र साजरे करतो. आम्ही मिळून अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. विशाळगड हे गाव प्रमुख महसूल ठिकाण असून, येथे बाहेरील राज्यातूनही पर्यटक येतात. 

मात्र, पर्यटकांना बंदी घातल्याने गावकरी मिठालाही महागले आहेत. गॅस सिलिंडर, अन्नधान्य, विजेचे बिल यांसारख्या मूलभूत गरजा भागविणेही कठीण झाले आहे. कित्येक घरे अंधाराखाली गेली आहेत. अनेक पोटांना उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शाळा, कॉलेजचे शुल्क भरता न आल्याने मुलांना शाळेत पाठवणे अवघड झाले आहे. बंद अर्थव्यवस्था येथील आठ वाडींसाठी हानीकारक आहे. आमच्या मुलांचे भविष्य टांगणीला आहे. आमचा गुन्हा काय?, आमच्यावर अत्याचार का ?. आम्ही कचरा व्यवस्था व अतिक्रमणाबाबत सहकार्य करण्यास तयार आहे, पण विशाळगडाची स्थिती पूर्ववत करा, अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Web Title: After the riots at Vishalgarh, the economy came to a standstill as the government imposed direct restrictions on tourism here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.