महापालिका, जिल्हा परिषदेत होणार ‘कुस्ती,’ सत्तेसाठी दोस्ती
By राजाराम लोंढे | Updated: November 27, 2024 16:25 IST2024-11-27T16:24:34+5:302024-11-27T16:25:49+5:30
पक्षांची मांदियाळी, इच्छुकांची भाऊ गर्दी : नाराजी टाळण्यासाठी स्वबळ अजमावले जाणार

महापालिका, जिल्हा परिषदेत होणार ‘कुस्ती,’ सत्तेसाठी दोस्ती
राजाराम लोंढे
कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांतील राजकीय स्थित्यंतरानंतर प्रमुख सात पक्षांमुळे इच्छुकांची भाऊ गर्दी होणार आहे. नाराजी टाळण्यासाठी स्वबळ अजमावले जाणार असून, निवडणुकीच्या रिंगणात कुस्ती करायची आणि त्यानंतर सत्तेसाठी दोस्ती करावी लागणार आहे.
विधानसभेची रणधुमाळी संपली असून, गेली चार वर्षे स्थगित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक आतापर्यंत लांबणीवर पडली असली तरी त्याला राजकीय किनारही नाकारता येणार नाही.
राज्यात महायुतीचे एकतर्फी सरकार सत्तेवर आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या महिना-दीड महिन्यात आरक्षणासह सर्वच अडचणी दूर होऊन जानेवारीच्या मध्यापर्यंत महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत प्रमुख चार, तर महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कोल्हापूर शहरातील समीकरणे बदलली आहेत.
महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस पक्ष ताकदवान होता; पण विधानसभेनंतर शिंदेसेनेचा आत्मविश्वास दुणावल्याने महायुतीमध्ये त्यांचा जागेवरील दावा वाढणार आहे. भाजप, ताराराणी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. पण, प्रभागातील चार पक्षांचे प्रमुख दावेदार, त्यातून होणारी बंडखोरी टाळण्यासाठी किमान शिंदेसेना, भाजप-ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांना स्वबळावरच लढावे लागणार आहे. बारा तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही या पक्षात जनसुराज्य, स्वाभिमानी पक्षाची भर पडणार आहे. त्यामुळे येथेही यापेक्षा वेगळे चित्र नसणार आहे.
प्रशासकराज आणि सामान्यांची ससेहोलपट
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबर २००० मध्ये, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभांच्या योजनांसह इतर स्थानिक विकासकामे मार्गी लागली जायची. गेली तीन-चार वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज असल्याने सामान्य माणसाची ससेहोलपट होत आहे.
विधानसभेसाठी कपडे फाडून घेणाऱ्यांचे काय?
विधानसभा निवडणुकीत महायुती व आघाडीमध्ये जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर कपडे फाटेपर्यंत प्रचार केला; पण स्वबळाच्या लढाईत त्यांच्याशीच दोन हात करावे लागणार आहेत.
प्रमुख पक्ष
काँग्रेस, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, माकप, भाकप, ‘रिपाइं’ (सर्व गट).
महापालिकेतील मावळत्या सभागृहातील बलाबल -
- काँग्रेस -३०
- राष्ट्रवादी काँग्रेस - १४
- ताराराणी आघाडी - १९
- भाजप - १४
- शिवसेना - ०४
जिल्हा परिषदेतील बलाबल
- काँग्रेस -१४
- भाजप - १४
- राष्ट्रवादी - ११
- शिवसेना -११
- जनसुराज्य - ६
- चंदगड विकास आघाडी -२
- स्वाभिमानी संघटना - २
- ताराराणी आघाडी - ३
- आवाडे गट - २
- शाहू आघाडी - १
- अपक्ष - १.