ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्चाचा दिला नाही हिशेब, कोल्हापुरातील ४४६ उमेदवार अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:02 IST2022-11-17T16:09:57+5:302022-11-17T17:02:47+5:30
निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या अनेक उमेदवारांना जोर का झटका बसला

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्चाचा दिला नाही हिशेब, कोल्हापुरातील ४४६ उमेदवार अपात्र
कोल्हापूर : जिल्ह्यात २०१७ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केलेल्या जिल्ह्यातील ४४६ उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही. महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी याबाबतचा बुधवारी हा आदेश काढला. यामध्ये हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज. पन्हाळा व करवीर तालुक्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. य आदेशामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या अनेक उमेदवारांना जोर का झटका जोरातच बसला आहे.
निवडणुकीनंतर ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर केला नाही अशा व्यक्तींना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाच वर्षांच्या कालावधीत पंचायत सदस्य म्हणून होण्यासाठी निवडणूक लढवता येत नाही. जिल्ह्यात २०१७ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वरील आठ तालुक्यांमधील ४४६ उमेदवारांनी हिशेब सादर केलेला नाही त्यामुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. या अपात्र उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नुकताच जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, थेट सरपंचपदासाठीदेखील निवडणूक होत आहे. त्यासाठी आपला विजय नक्की असे समजून तयारीला लागलेल्या अनेक स्थानिक उमेदवारांना झटका बसला आहे.