Kolhapur: गेले आंदोलनाचे वारे... आता नाहीत एन.डी., गोविंद पानसरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:23 IST2025-10-14T15:22:50+5:302025-10-14T15:23:02+5:30
१९८२ च्या आंदोलनाची जागवली आठवण

Kolhapur: गेले आंदोलनाचे वारे... आता नाहीत एन.डी., गोविंद पानसरे
कोल्हापूर : शहरातल्या कोणत्याही एका कोपऱ्यावर साध्या नळाला जरी गळती लागली तरी शे-पाचशे लोकांचे आंदोलन होऊन ती गळती तातडीने बंद करायला लावणारी आंदोलनेकोल्हापूर शहराने पाहिली आहेत. आता रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत असताना, खड्ड्यांच्या माळा लागल्या असताना आंदोलनासाठी देशात प्रसिद्ध असलेले कोल्हापूर इतके शांत कसे असा सवाल सोशल मीडियातूनच उपस्थित केला जात आहे. यावर काही नेटकऱ्यांनी एन.डी.पाटील, गाेविंद पानसरे यांच्यासारखी कोल्हापूरबद्दल आत्मीयता असणारी माणसं निघून गेली. त्यामुळे हे बकालपण वाट्याला आल्याची खंत व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची सध्या पुरती वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने शहराची संपूर्ण राज्यभर बदनामी होत आहे. अनेकदा पाणीपुरवठा खंडित होत असल्याने महिलांसह नागरिकांना घागरी घेऊन वणवण भटकण्याची वेळ येते. कोल्हापूर समस्यांनी इतके ग्रासले असतानाही यावर कोल्हापुरी पद्धतीने का आवाज उठवला जात नाही, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
वाचा- खड्ड्यांचा वाढदिवस, प्रतीकात्मक अंत्ययात्रा; कोल्हापुरात आगळ्या वेगळ्या आंदोलनातून महापालिकेचा निषेध
इथे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या नेत्याला आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे भाग्यविधाते समजतो. नेत्यांच्या प्रेमात जनता असल्याने कुणी कुणाविरोधात बोलायचे धाडस करत नाही. या आधारस्तंभांमुळेच शहराची ग्रामपंचायत झाली आहे, हेच कुणी समजून घेत नाही. अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे दिवस गेले. आता एन.डी.पाटील, गोविंद पानसरे नाहीत. त्यांचे विचारही कुणी पुढे नेत नाही. त्यामुळे देशात आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरचे हे वारे लुप्त पावले आहे, या शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
१९८२ च्या आंदोलनाची जागवली आठवण
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी १९८२ मध्ये रिक्षावाल्यांनी महापालिकेला घेराव घातला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित टेंडर काढून शहरातील सगळे रस्ते दर्जेदार केले होते. आता अशा आंदोलनाची गरज असल्याच्या अपेक्षा नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.