Kolhapur: मोजणीनंतर अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार, विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:59 IST2025-06-12T15:59:07+5:302025-06-12T15:59:21+5:30

नगर भूमापन विभागास पत्र

After the count the American Mission near the Kolhapur Collectorate office will remove encroachments on the land | Kolhapur: मोजणीनंतर अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार, विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर धावाधाव

Kolhapur: मोजणीनंतर अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार, विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर धावाधाव

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील मोक्याची आणि कोट्यवधी रुपयांची अमेरिकन मिशन नावाची ५७ एकर १७ गुंठे जमीन सरकारचीच असल्याचा महत्त्वपूर्व निकाल पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्यानंतर करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी बुधवारी जमीन मोजणीसाठी शहर भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज दिला आहे. मोजणीनंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, जमिनीशी हितसंबंध असलेल्यांचे निकालाने धाबे दणाणले आहे. ते दिवसभर महसूल, भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांकडे धावाधाव करीत असल्याचे दिसले. मात्र, विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अंमलबाजवणी संबंधित अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे प्रमुख दिलीप देसाई यांनी एका पत्राद्वारे करवीर तहसील प्रशासनाकडे केली आहे.

जमिनीचा सत्ता प्रकार बदलासंबंधीच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दीर्घ सुनावणी घेऊन निकाल दिला. निकालाला विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिल्यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई करता आली नाही. पण, आता विभागीय आयुक्तांनीच रेखावार यांचा निकाल कायम केल्याने करवीर तहसीलदार यांना अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी लागणार आहे. म्हणूनच त्यांनी जमीन मोजणीसंबंधीचा अर्ज भूमापन प्रशासनाकडे दिला आहे.

रेखावार यांच्या आदेशानुसार जमिनीचा ब सत्ताप्रकार म्हणजे शासकीय हक्क कमी करण्यासाठी दोषी असलेले त्यावेळच्या नगरभूमापन विभागाच्या अधिकारी यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. करवीर प्रांताधिकाऱ्यांना वाद मिळकतीमधील सर्व व्यवहाराची व अनियमिततेची सविस्तर चौकशी करून शर्तभंगाची कार्यवाही रेखावार यांच्या निकालानुसार करावी लागणार आहे. मात्र, या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीही असल्याने कारवाईसंबंधी काय होणार याकडे कोल्हापूरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

पत्र पोहोचलेच नाही..

जमीन मोजणीसाठी करवीर तहसील कार्यालयाकडून नगर भूमापनला अर्ज दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ‘लोकमत’ने नगर भूमापन कार्यालयाकडे चौकशी केल्यानंतर सायंकाळी सातपर्यंत पत्र आलेले नाही, असे सांगण्यात आले.

अमेरिकन मिशन जमीन मोजणीसाठी शहर नगरभूमापन कार्यालयास पत्र दिले आहे. मोजणीनंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल. - स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर.

Web Title: After the count the American Mission near the Kolhapur Collectorate office will remove encroachments on the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.