कागल-सातारा सहा पदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर सेवा रस्तेही सिमेंटचेच
By भीमगोंड देसाई | Updated: November 5, 2025 12:34 IST2025-11-05T12:33:11+5:302025-11-05T12:34:04+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रस्ताव : पुणे - साताऱ्यापर्यंतचे काम सुरू

संग्रहित छाया
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पुणे आणि बंगळुरू राष्ट्रीय महामार्गातील कागल - सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सेवा रस्तेही सिमेंटचे करण्यात येणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाकापर्यंत रस्त्याचे काम ८० टक्के तर पेठनाका ते कागलपर्यंतचे काम केवळ ५० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, तेथे सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने तो प्रचंड खराब झाला आहे. याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. म्हणून तातडीने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक सेवा मार्गावरून वळवण्यात आली आहे. सेवा रस्त्याची वाट लागली आहे. त्यांची अवस्था नांगरलेल्या शेताप्रमाणे झाली आहे. भविष्यात अशी स्थिती सेवा रस्त्याची होऊ नये म्हणून मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सेवा रस्तेही सिमेंटचे करण्यात येणार आहे. सध्या डांबरीकरणाचे असल्याने वारंवार छोटे, मोठे खड्डे पडत आहेत. पावसाळ्यात डांबर वाहून जाते. म्हणून भविष्यात राष्ट्रीय महामार्गावर डांबराचे काम बंद करून केवळ सिमेंटचेच रस्ते करणे प्रस्तावित आहे, असे प्राधिकरणाच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेड ही ठेकेदार कंपनी तर पेठनाका ते कागलपर्यंत रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करीत आहे. शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंत भुयारी आणि उड्डाणपुलाच्या ठिकाणात बदल न झाल्याने हे काम गतीने होत आहे. पेठनाका ते कागलपर्यंतच्या रस्ता कामात पहिल्यांदा भराव्यासह उड्डाणपूल प्रस्तावित होते. त्याला विरोध झाला. त्यामुळे पूर्वीच्या पुलाचे आराखडे बदलून मंजुरी घेण्यास विलंब झाला. काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध झाला. ठेकेदार कंपनी कमी दराने निविदा भरली आहे. यामुळे कामास विलंब होत आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
दृष्टीक्षेपातील कागल - सातारा रस्ता
- १२८ किलोमीटर
- कागल ते पेठनाका मंजूर निधी : १०२५ कोटी
- किलोमीटर ६१ किलोमीटर
- पेठनाका ते शेंद्रे मंजूर निधी : २००८ किलोमीटर
- किलोमीटर ६७ किलोमीटर
समन्वय नसल्याने कामावर परिणाम
महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी पोट ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. पोट आणि मुख्य ठेकेदार यांच्यातील समन्वयामुळेही काम संथ गतीने होत असल्याचा आरोप होत आहे.