Kolhapur News: भेसळयुक्त प्रसाद, अन्न औषध प्रशासन विभागाची जोतिबा डोंगरावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:56 IST2026-04-01T18:55:21+5:302026-04-01T18:56:27+5:30
२६ हजार रुपये किमतीच्या पेढ्यांसह आइस्क्रीम नष्ट करून टाकले

Kolhapur News: भेसळयुक्त प्रसाद, अन्न औषध प्रशासन विभागाची जोतिबा डोंगरावर कारवाई
पोर्ले तर्फ ठाणे : जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त बाजारपेठेत प्रसाद म्हणून विक्रीला आलेल्या भेसळयुक्त आणि मुदतबाह्य झालेले २६ हजार रुपये किमतीच्या पेढ्यांसह आइस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आइस्क्रीम नष्ट करून टाकले.
श्री क्षेत्र जोतिबा डोंगराची चैत्र पौर्णिमेची यात्रा बुधवारी संपन्न होत आहे. या यात्रेत प्रसाद म्हणून विक्रीसाठी आइस्क्रीम, खाद्यपदार्थ आणि पेढ्यांची मोठ्या प्रमाणात होत असते. पेढ्यांमध्ये कर्नाटकात उत्पादन झालेले पेढे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले जातात. हे पदार्थ भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने अन्न प्रशासनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांच्या पदार्थांची तपासणी करून कारवाई केली जात आहे.
Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबा यात्रेचा गुलाली रंग..पाऊसधारा झेलत भाविक दंग
अन्न प्रशासन विभागाने जोतिबा डोंगरावरील सर्व विक्रेत्यांच्या मालाची तपासणी सुरू केली आहे. दोन दिवसांत मुदत संपलेले, भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ते नष्ट करण्यात आले. २६ हजार रुपये किमतीचे पेढे आणि आइस्क्रीम विकणाऱ्या टोळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत पेढे आणि आइस्क्रीम नष्ट करून टाकले असल्याचे माहिती अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी सांगितले.
दरम्यान कारवाईवेळी पेढा आणि कलाकंद यांच्या प्रत्येक पॅकिंगवर उत्पादन तिथी आणि मुदत बाह्य तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिला.