Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:05 IST2022-12-17T13:04:58+5:302022-12-17T13:05:21+5:30
जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींसाठी ‘काॅंटे की टक्कर’. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. त्यासाठी शनिवारी केंद्रनिहाय ३ हजार ७४० बॅलेट युनिट आणि २ हजार ७९९ कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ९ हजार १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही मतदानाची वेळ आहे.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी माघारीनंतर ४५ ग्रामपंचायतींवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्यामुळे आता ४२९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ‘काॅंटे की टक्कर’ होणार आहे. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, जिल्ह्यातील १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ३ हजार ९४० ईव्हीएम मशीन तयार ठेवण्यात आल्या असून, एखाद्या केंद्रावर अचानक मशीन बंद पडले तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्या-त्या तहसील कार्यालयात १० टक्के मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार असल्याने आज (शनिवारी) त्या-त्या भागातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. करवीरमधील साहित्य वाटप रमणमळा येथे होणार आहे. लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक दिवस आधीच केंद्र असलेल्या गावांमध्ये निवासासाठी जाण्यास सांगितले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसह शिक्षक असे ९ हजारांवर कर्मचारी यादिवशी कार्यरत राहणार आहेत. दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी ग्रामपंचायत विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.
मतदान केंद्रांवर १४४ कलम लागू
निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी उद्या रविवारी मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी सायंकाळी हा आदेश काढला असून त्यानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.