कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार

By पोपट केशव पवार | Updated: June 14, 2025 12:45 IST2025-06-14T12:45:24+5:302025-06-14T12:45:50+5:30

विनापरवानगी बांधकाम

Action will be taken against tall buildings in the Kolhapur airport area | कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार

कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार

पोपट पवार

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळशेजारील गावांमध्ये काही इमारतींची उंची अनधिकृतपणे वाढवली गेल्याने या इमारती विमानाला अडथळा ठरत आहेत. अशा इमारतींची यादी विमानतळ प्राधिकरणाने संकलित केली असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तशी प्रक्रियाही विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

कोल्हापूर विमानतळ उजळाईवाडी गावच्या हद्दीत येत असून या विमानतळाशेजारील सरनोबतवाडी, विकासवाडी, गाेकूळशिरगाव, नेर्ली, तामगाव, हलसवडे व गडमुडशिंगी या गावची जमीन संपादित केली आहे. सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी २,३०० मीटर करण्यात येत आहे. हीच धावपट्टी काही दिवसांत ३ हजार मीटर करण्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रकिया सुरू आहे. त्यामुळे धावपट्टी वाढल्यानंतर विमानाला टेकऑफ किंवा लँडिंग करताना शेजारील इमारतींच्या उंचीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.

विमान उतरताना किंवा झेपावताना उंच इमारतीच्या अडथळ्यामुळे अनेकदा विमानांचे अपघात झाले आहेत. हे टाळण्यासाठी विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीला मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करुन इमारती बांधल्या जातात. कोल्हापूर विमानतळाशेजारील गावांमध्ये अशा अडथळा ठरणाऱ्या इमारती किती आहेत याची माहिती प्रशासनाने संकलित केली आहे.

विनापरवानगी बांधकाम

विमान उतरताना किंवा झेपावताना उंच इमारतींचा वैमानिकाला अडथळा येतो. त्यामुळे अशा इमारतींना लाल, पांढरे पट्टे मारले जातात. मात्र, अनेकदा हे पट्टेही दिसून येत नाहीत. विशिष्ठ उंचीच्या नंतर बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, अनेकदा ही परवानगी न घेताच इमारती बांधल्या जातात. कोल्हापूर विमानतळाशेजारी उंच इमारती बांधताना अनेकांनी एअरपोर्ट ॲथॉरिटीची परवानगी घेतली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नेमक्या अशा अडथळा ठरणाऱ्या किती इमारती आहेत हे सांगण्यास मात्र प्रशासनाने नकार दिला.

विमानतळाचा विस्तार होण्याआधी एअरपोर्ट ॲथॉरिटीची परवानगी घेऊन उंच इमारती बांधल्या असतील तर या इमारती पाडताना त्याची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी. परवानगी न घेता बांधलेल्या उंच इमारतींवर कारवाई व्हावी. - के.पी. खोत, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर.
 

कोल्हापूर विमानतळाशेजारी विमानाला अडथळा ठरणाऱ्या किती इमारती आहेत याची माहिती आम्ही संकलित केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करणार आहोत. - अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण.

Web Title: Action will be taken against tall buildings in the Kolhapur airport area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.