लाचप्रकरणी समादेशकास निवृत्तीनंतर अटक, खुशाल सपकाळेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:17 IST2019-02-06T18:13:40+5:302019-02-06T18:17:18+5:30
कोल्हापूर : गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी ...

‘भारत राखीव बटालियन ३’च्या सेवानिवृत्त समादेशक संशयित खुशाल सपकाळे याला न्यायालयात घेऊन जाताना पोलीस. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर : गट मुख्यालय येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी व सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून ४0 हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने ‘भारत राखीव बटालियन ३’च्या समादेशकास निवृत्तीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तब्बल सहा महिन्यांनी मुंबईत राहत्या घरी मंगळवारी रात्री अटक केली.
संशयित खुशाल विठ्ठल सपकाळे (वय ५९, रा. मरोशी, भवानीनगर, मरोळ, मुंबई) असे त्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लाच मागण्यासाठी व इतर गैरकारभारासाठी सपकाळे पंटर रॉबर्टच्या मोबाईलचा वापर करत होता. त्याचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाचेची मुळ कारवाई
आॅगस्ट २०१८ पासून ‘भारत राखीव बटालियन ३’च्या अंतर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या सरावाकरिता एकत्रित आलेल्या खेळाडूंना वारंवार हजेरी घेऊन त्रास न देणे, बंदोबस्ताला पाठविण्यात येईल, खेळाडू जवानांना शासनाकडून दिला जाणारा आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी व सोसायटीकडून एक लाख रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी जवानांकडून ४0 हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची टोळी १७ जुलै २०१८ रोजी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकली होती. त्या
मध्ये संशयित सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी (रा. टेंबलाईवाडी, मूळ रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज), पोलीस निरीक्षक मधुकर श्रीपती सकट (रा. एस. आर. पी. कॅम्प, सध्या रा. निपाणी-लिमगाव, जि. बेळगाव), लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव (रा. प्रिन्स शिवाजीनगर, कसबा बावडा, मूळ रा. लखनापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे (रा. संभाजीपूर, शिरोळ), आनंदा महादेव पाटील (रा. बस्तवडे, ता. कागल), पोलीस शिपाई प्रवीण प्रधान कोळी (रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांचा समावेश होता.
बटालियनचे प्रमुख समादेशक खुशल सपकाळे याचे नाव लाच मागणीमध्ये पुढे आले होते. त्याच्याशी तक्रारदाराचे पैसे दिल्यासंबंधीचे बोलणे झाल्याचे कॉल रेकॉर्डही पथकाच्या ताब्यात होते. तो मुंबईमध्ये असल्याने कारवाईदरम्यान मिळून आला नव्हता. चौकशीसाठी त्याला निरोप धाडले असता, तो हजर होत नव्हता. तो लाच रॅकेटमधील मास्टर मार्इंन्ड असल्याची पोलिसांची माहिती होती. कोल्हापूर विभागातून बदली झाल्यानंतर लातुर येथे एक दिवस हजर झाला. त्यानंतर आजारी रजेवर गेला. कारवाईची चाहुल लागताच त्याने आपला मोबाईल बंद ठेवला होता. पोलिसांना तो वारंवार चकवा देत होता.
कारचालकाच्या मोबाईलचा वापर
संशयित सपकाळेच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व व्हॉटस् अॅपची माहिती काढली असता, त्याच्याकडे कारचालक म्हणून काम करणारा पंटर रॉबर्ट याच्या नावावर तो मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे हा नंबर सपकाळे साहेब या नावाने नोंद आहे.
पैशाची देवाणघेवाण व इतर गुंतवणूक, गैरकारभार करण्यासाठी सपकाळे या मोबाईलचा वापर करीत होता. पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्डही ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात सपकाळे याचा संबंध असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्यानंतरच बुधवारी त्यास मुंबई येथे अटक केली.
मालमत्तेची चौकशी
सपकाळे यांच्या मुंबई येथील फ्लॅटची पथकाने झडती घेऊन काही महत्त्वाची कागदपत्रके जप्त केली. बँक खातीही गोठवली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत त्यांच्या नावाने मालमत्ता आहे का?, याबाबत चौकशी सुरूआहे.