अब्दुल लाट परिसरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड, भर रस्त्यावर घडली घटना; संशयितास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:43 IST2022-01-27T16:42:51+5:302022-01-27T16:43:21+5:30
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे अब्दुल लाट पंचक्रोशीत खळबळ उडाली.

अब्दुल लाट परिसरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड, भर रस्त्यावर घडली घटना; संशयितास अटक
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट येथे एका ४० वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर भरदिवसा रस्त्यातच ॲसिड फेकण्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. या ॲसिड हल्ल्यात संबंधित महिलेचा चेहरा पूर्णपणे भाजला असून तिची प्रकृती अत्यावस्थ आहे. तिला उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
दरम्यान, ॲसिड हल्लाप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी गावातीलच एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हा हल्ला अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा परिसरात आहे.
सीपीआर रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, अब्दुल लाट येथील महिला हातकणंगले येथील एका शिक्षण संस्थेत आया म्हणून काम करते. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती एका व्यक्तीसोबत घरातून दुचाकीवरून इचलकरंजीला जाण्यासाठी बाहेर पडली; पण घरानजीकच तिचा त्या व्यक्तीसोबत किरकोळ वाद झाला. दुचाकीवरून काही अंतरावर गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिला रस्त्यातच गाडीवरून खाली उतरून सोबत आणलेल्या बाटलीतील ॲसिड तिच्या तोडांवर मारले. यामुळे ती भाजून जखमी झाली.
भाजल्याने संबंधित महिलेने आरडा-ओरडा केला. यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. दरम्यान हल्लेखोराने तेथून पळ काढला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे अब्दुल लाट पंचक्रोशीत खळबळ उडाली. नागरिकांनी तिला खासगी वाहनातून कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी दुपारी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.