कोल्हापूर : महाराष्ट्रभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचलेल्या तसेच प्रत्येक वर्षी कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘लोकमत’ महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वातील पहिल्याच स्पर्धेत रविवारी कोल्हापूरसह राज्यभरातून आलेले हजारो स्पर्धक अगदी ‘बिनधास्त’ धावले. या स्पर्धेत १० किलोमीटरच्या खुल्या गटात पुरुषांमध्ये उचगांव (ता. करवीर) येथील अभिषेक देवकाते याने ३२ मिनिटे ५८ सेकंदात, तर महिलांमध्ये सातारा येथील साक्षी जडयाल हिने ३५ मिनिटे २४ सेकंदात ही शर्यत जिंकली. विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ९९९९ रुपयांचा धनादेश, चषक, प्रमाणपत्र देण्यात आले.
या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने बोचऱ्या थंडीतील प्रसन्न वातावरणात स्पर्धकांसह क्रीडा रसिक, शालेय विद्यार्थी, झांजपथकांनी एक सळसळता उत्साह निर्माण केला आणि हा क्षण एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला. व्यावसायिक आणि हौशी धावपटूंसह वृध्द, महिला आणि लहान मुलांचा या स्पर्धेतील सहभाग लक्षवेधी ठरला.
‘लोकमत’ने आवाहन करताच हजारो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ‘भागो’ ही टॅगलाइन असलेल्या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने चार दिवस अगोदरच खेळाडूंची नोंदणी थांबवावी लागली. त्यामुळे सहभाग घेता न आल्याने अनेक खेळाडू निराश झाले; परंतु तरीही त्यांनी सहभागी खेळाडूंचा उत्साह मात्र रस्त्यावर येऊन वाढवला. ७१ वर्षांच्या एका आजीने तर थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच मॅरेथॉनचे कौतुक केले. शिस्तबध्द, नियोजनपूर्ण इव्हेंट, वेगळेपणा, उत्कंठावर्धक, लक्षवेधी, जोश, उत्साह अशा विशेषणांची प्रचिती या महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने धावपटूंना आली. क्रीडा रसिकांच्या स्मरणात ही स्पर्धा दीर्घकाळ राहिल. रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन उगवली. एरवी शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल- ताशाच्या कडकडाटाने भंग पावली. मैदानावरील चैतन्यमय वातावरण पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केला.
अखेर उत्कंठा संपली....
सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी १० किलोमीटरच्या व्यावसायिक धावपट्टूंसाठी असलेल्या पॉवर रनला प्रारंभ झाला. पाच... चार... तीन...दोन... एक असे म्हणत उपस्थित मान्ववरांची झेंडा दाखविताच क्षणाचाही विलंब न करता धावपट्टूंनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. या गटात राज्यभरातील विविध शहरात होणाऱ्या महामॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकही भोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने ५ किलोमीटर आणि त्यानंतर ३ किलोमीटरची फन रन सुरु झाली.
मान्यवरांची उपस्थिती
जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्छू, प्रशांत अमृतकर, खासदार धनंजय महाडिक, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे, सांगली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेमकुमार राठोड, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, व्यवस्थापकीय संचालक सुधीर कामेरीकर, मार्केटिंग हेड अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, प्रशासनचे उत्तम पाटील, संचालक शिवाजी जंगम, एन. आर. पाटील, मिलिंद हिरवे, राजवर्धन मोहिते, अभिजित पाटील, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश गोडबोले, सुंदर बिस्किट ॲन्ड नमकीनचे एरिया सेल्स मॅनेजर राहुल सहारे, अमित हुक्केरी, एलआयसीचे सिनियर डिव्हिजनल मॅनेजर चंद्रप्रकाश पराते, मानसिंग खोराटे कॉर्पचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, मॉडेल होमिओपॅथीचे संचालक दिग्विजय माने, झंडू रिलिफ इंडियाचे मार्केटिंग हेड भरत शिंदे, अशोकराव माने इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष विजयसिंह माने, सिद्धीविनायक रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप पाटील, ‘लाेकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हौशी धावपट्टूंनी वाढविली रंगत
स्पर्धेतील पाच आणि तीन किलोमीटर फॅमिली फन रनमध्ये स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या दोन्ही गटात तीन वर्षांपासून सत्तरी गाठलेल्या स्पर्धकांनी भाग घेताना ‘हम भी फिट है’ याची साक्ष देत धावले. या गटात अनेक कुटुंबातील आई, वडील, मुले असा एकत्रित भाग घेत धावण्याचा आनंद लुटला. कधी धावत, तर कधी चालत जात त्यांनी स्पर्धेचे अंतर पूर्ण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत शासकीय, महानगरपालिका, पोलिस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धावण्याचा मोह आवरला नाही. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्पर्धा पूर्ण करत आपली शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध केली.
जोश वाढविणारे वातावरण
चारही गटातील स्पर्धेच्या मार्गावरील वातावरण जोश वाढविणारे होते. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यावर झांजपथक, बँडपथक, ढोल-ताशे पथक, लेझीम पथकातील वादकांनी वाद्यांचा दणदणाट करीत स्पर्धकांना ‘चिअर अप’ केले. फुले उधळत विद्यार्थ्यांनी तर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या क्रीडाशौकिनांनी टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहित केले.
स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा
१० किलोमीटर गट (खुला गट पुरुष) : -अभिषेक देवकाते ( ३२ मिनिटे, ५८ सेकंद )-पृथ्वीराज कांबळे ( ३३ मिनिटे, ५६ सेकंद)-गौरव काकडे ( ३६ मिनिटे, १६ सेकंद )
१० किलोमीटर गट (खुला गट महिला) : -साक्षी जडयाल (३५ मिनिटे, २४ सेकंद)-सृष्टी रेडेकर (३८ मिनिटे, ३४ )-साक्षी कुसळे ( ४८ मिनिटे, ५० सेकंद)
निओ वेटरन पुरुष गट : -मल्लिकार्जुन पारदे ( ३७ मिनिटे, १८ सेकंद) -महेश यादव ( ३९ मिनिटे, ३५ सेकंद)-अमोल यादव ( ४० मिनिटे, २४ सेकंद )
निओ वेटरन महिला गट :-सयुरी दळवी ( ४८ मिनिटे, ३३ सेकंद)-मीनाताई देसाई ( ४९ मिनिटे, ५७ सेकंद)-चित्रा सापळे ( ५० मिनिटे, २७ सेकंद)
वेटरन (पुरुष )-संतु वारदे ( ३६ मिनिटे, ५१ सेकंद)-प्रमोद उरकुडे (३७ मिनिटे,५ सेकंद)-आरबीएस मोनी ( ३९ मिनिटे, २८ सेकंद)
वेटरन (महिला) -डॉ. पल्लवी मूग ( ५० मिनिटे, २६ सेकंद)-द्राक्षायिणी मुरगोड ( ५९ मिनिटे, ३२ सेकंद)-डॉ. प्राजंली धामणे ( १ तास ६ मिनिटे, ४४ सेकंद)
Web Summary : Abhishek Devkate and Sakshi Jadyal triumphed at Lokmat Maha Marathon, Kolhapur. Thousands participated in the event, marked by enthusiasm and impressive athletic performances across various categories. The marathon witnessed spirited participation from all age groups.
Web Summary : अभिषेक देवकाते और साक्षी जडयाल ने कोल्हापुर में लोकमत महा मैराथन जीती। हजारों प्रतिभागियों ने उत्साह के साथ विभिन्न श्रेणियों में उत्कृष्ट प्रदर्शन किया। मैराथन में सभी आयु वर्ग के लोगों ने जोशपूर्ण भागीदारी दिखाई।