कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तिघांनी पाठलाग करून प्रकाश बबन बोडके (वय २४, रा. फुलेवाडी, कोल्हापूर) याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार बुधवारी (दि. ३१) दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी पेठेतील वर्दळीच्या निवृत्ती चौकात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. जखमी बोडके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत येथील तरुणांच्या टोळक्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून खुन्नस निर्माण झाली आहेत. यातूनच बुधवारी दुपारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात प्रकाश बोडके याच्यावर तिघांनी हल्ला केला. हल्लेखोर तलवार घेऊन आल्याचे पाहून बोडके जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. चौकातील एका दुकानात शिरलेल्या बोडकेला बाहेर काढून त्याच्यावर हल्लेखोरांनी तलवारीने वार केले. या हल्ल्यात बोडके याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. बोडके जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी पळ काढला. परिसरातील नागरिकांनी जखमीला सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले.वर्दळीच्या निवृत्ती चौकात भरदुपारी तलवार हल्ला झाल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमीशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी एक पथक तैनात केल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
Kolhapur Crime: शिवाजी पेठेत पाठलाग करून तरुणावर जीवघेणा तलवार हल्ला; हल्लेखोर पसार
By उद्धव गोडसे | Updated: May 31, 2023 16:35 IST