Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:04 IST2025-09-02T19:03:49+5:302025-09-02T19:04:22+5:30
मित्रांनी दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

संग्रहित छाया
सडोली (खालसा) : नंदवाळ (ता. करवीर) येथील तरुण, पोलिस भरतीत निवड व्हावी म्हणून पहाटेपासून व्यायाम करणारा सुनील वामन कांबळे (वय ३०) याचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळी सहा वाजता व्यायाम करत असताना छातीत कळ आली आणि काही क्षणांतच काळाने सुनीलला कवेत घेतले. मित्रांनी दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिस वर्दी परिधान करून राज्यसेवा करावी, हे सुनीलचं ध्येय होतं. मात्र, त्या जिद्दी तरुणाचे हे स्वप्न स्वप्नच राहून गेले. सुनीलच्या अकस्मात निधनाने नंदवाळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनीलच्या जाण्याने कांबळे कुटुंब उघड्यावर आले आहे. दोन लहान मुले, पत्नी, आई-वडील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आता विस्कळीत झाला आहे.