जनावरे चरायला घेऊन गेलेला जेलुगडेचा युवक अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:52 IST2025-06-18T20:51:38+5:302025-06-18T20:52:59+5:30
जंगलाशेजारी जनावरे चरावयास नेलेल्या युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना जेलुगडे येथे घडली आहे.

जनावरे चरायला घेऊन गेलेला जेलुगडेचा युवक अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी
जंगलाशेजारी जनावरे चरावयास नेलेल्या अविवाहित युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास जेलुगडे येथील शेतात घडली. दिपक पांडुरंग नार्वेकर (वय ३९, रा. जेलुगडे) हा जखमी झाला असून त्याच्या डोकीवर अनेक ठिकाणी अस्वलांची नखे लागली आहेत.
दिपकने बुधवारी आपल्या गावाजवळील शेतात नेहमीप्रमाणे जनावरे चरावयास नेली होती. दुपारी तीनच्या सुमारास शेजारच्या जंगलातील अस्वल व त्याच्या पिल्लाने दिपकवर अचानक हल्ला केला. बेसावधपणामुळे सुरुवातीला त्याला काही समजलं नाही. पण त्यानंतर दिपकने त्यांचा प्रतिकार केला. या झटापटीत दोन्ही अस्वलांची नखे त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर लागली. यामुळे तो रक्तबंबाळ झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल नेताजी धामणकर, वनरक्षक खंडू कोरे, वनसेवक तुकाराम गुरव, शुभम बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची परिस्थिती पाहून त्यांनी त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलविले. सध्या दिपकची प्रकृती स्थिर असून त्याच्या जिवितास धोका नसल्याचे पाटणे वनविभागाच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील यांनी सांगितले. तसेच जंगलाशेजारी जाताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.