Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:09 IST2025-11-17T13:08:46+5:302025-11-17T13:09:26+5:30
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे आठवड्यातील दुसरी घटना

Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याने हल्ला केला. हल्ल्यात संदीप दिनकर काटकर हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सोमवार (दि.१७) सकाळच्या सुमारास घडली.
संदीप काटकर हे सकाळी युवराज विठ्ठल काटकर यांच्या बारथळ नावाच्या शेतातील बांधावरील गाजर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला. गव्याचे शिंग पोटात, डाव्या बाजूला बरकडी खुसले. छातीला मार लागल्याने काटकर गंभीर जखमी झाले.
यावेळी जवळच नांगरटीसाठी आलेले अमोल जाधव व सखाराम म्हेतर यांना ओरडण्याचा आवाज आला. घटनास्थळी त्यांनी धाव घेतली असता काटकर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. जाधव, म्हेतर यांनी त्यांना बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूरला खासगी दवाखान्यात दाखल केले.
आठवड्यातील दुसरी घटना..
गुरुवारी (दि.१३) काळजवडे (ता. पन्हाळा) येथील २३ वर्षीय अजिंक्य दादू पाटील या तरुणाला सुंभेवाडी येथे सकाळी शेतीच्या कामानिमित्त गेला असता गवा रेड्याने जखमी केले होते. अजून तो दवाखान्यात असताना दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.