Kolhapur: रंगकाम करताना लागला 'शॉक', तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण ठार; सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:35 IST2024-10-09T15:34:33+5:302024-10-09T15:35:36+5:30
साळोखेनगरातील घटना : मृत तरुण इस्पुर्लीचा

Kolhapur: रंगकाम करताना लागला 'शॉक', तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण ठार; सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
कोल्हापूर : साळोखेनगर येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रंगकाम करताना सर्व्हिस वायरमधून विजेचा धक्का लागल्याने खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला. विजय आनंदराव भोसले (वय ३१, सध्या रा. विक्रमनगर, कोल्हापूर, मूळ रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, विजय भोसले हा त्याच्या एका जवळच्या पाहुण्यांकडे रंगकाम करीत होता. पाहुण्याने साळोखेनगर येथील शिवगंगा कॉलनीतील शीतल पांडुरंग खापले यांच्या इमारतीचे रंगकाम घेतले होते. मंगळवारी सकाळी विजय हा तिसऱ्या मजल्याची भिंत बाहेरच्या बाजूने रंगवत होता. त्यावेळी इमारतीच्या सर्व्हिस वायरमधून विजेचा धक्का लागून तो खाली पडला.
सुमारे ३० ते ३५ फुटांवरून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
सहा महिन्यांपूर्वीच लग्न
विजय भोसले याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. कामासाठी तो इस्पुर्लीतून विक्रमनगर येथे राहण्यासाठी आला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने आई आणि पत्नीचा आधार हरपला.