kolhapur: बँकॉकमध्ये इमारतीवरून पडून शिरगावच्या महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:11 IST2024-03-26T13:10:50+5:302024-03-26T13:11:20+5:30
शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी ) येथील सुनील ईश्वरा जाधव याच्या पत्नी गीता सुनील जाधव (वय ४५) यांचा ...

kolhapur: बँकॉकमध्ये इमारतीवरून पडून शिरगावच्या महिलेचा मृत्यू
शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी ) येथील सुनील ईश्वरा जाधव याच्या पत्नी गीता सुनील जाधव (वय ४५) यांचा थायलंडमधील बँकॉक शहरात एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, उद्या दुपारी मृतदेह शिरगावला येण्याचा अंदाज आहे.
येथील सुनील जाधव हे आपली पत्नी गीता आणि मुलगा ओंकार सुनील जाधव ( वय १६ ) यांच्यासह बँकॉक इथे नोकरीनिमित्ताने राहत होते. गीता यांचे बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाले होते. २००३ साली लग्न होऊन त्या सुनीलसोबत संसार करत होत्या. सुरुवातीला दोघेही गोवा येथे नोकरी करत होते. त्यानंतर २०१८ पासून थायलंडमध्ये नोकरीनिमित्ताने वास्तव्य करत आहेत. बॉश कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
२२ मार्च रोजी सुनील कंपनीमध्ये कामांवर गेला होता. गीता या मुलगा ओंकारसह घरी होत्या. कपडे वाळत घातलेले होते ते काढण्यासाठी गीता गेल्या असता त्यांचा पाय घसरून नवव्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. मुलगा ओंकार बाथरुममध्ये असताना ही घटना घडली. त्याने वडिलांना फोनवरून घटनेची माहिती दिली. वडील आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन तेथे आले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सर्व सोपस्कार पूर्ण करून मंगळवारी मृतदेह मुंबईमध्ये विमानाने घेऊन तो उद्या दुपारी शिरगावमध्ये येणार आहे.
गीता यांचे माहेर आरळे ( ता.करवीर ) हे असून, त्यांचे आई-वडील मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत. ते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून, भाऊ पोलिस खात्यात नोकरीला आहेत. गीता यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.