मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 16:57 IST2023-12-30T16:44:34+5:302023-12-30T16:57:34+5:30
सरपंच, उपसरपंचासह सदस्य आपले मानधन देणार

मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
अभय व्हनवाडे
रुकडी/माणगाव : माणगाव ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने लग्न होऊन सासरी जाणा-या मुलीसाठी संसार उपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबत निर्णय झाला असून या नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून होणार आहे.
राज्यात विविध योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या माणगाव ग्रामपंचायतीनी लेक लाडकी माझ्या गावाची या योजनेंतर्गत संसार उपयोगी साहित्यासह कुटुंबसंवर्धन पुस्तिका संच देणार आहे. यासाठी सरपंच व उपसरपंचसह, ग्रामपंचायत सदस्य यांना मिळणारे मानधन यासाठी देणार असून ग्रामपंचायत फंडातून दोन लाख रूपयाची तरतूद करण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभासाठी मुलगीचे आई-वडील गावचे रहिवाशी असणे बंधनकारक असून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. विवाह आई वडील यांच्या मान्यतेने होणे आवश्यक असणार असल्याची माहिती उपसरपंच अख्तर भालदार यांनी दिली. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
मुलीसाठी गावची आठवण
गावामध्ये रस्ते, गटर्स, हॉल, बांधकाम ही कामे वर्षानुवर्षे होत असतात. पण लग्न होऊन सासरी जाणा-या मुलीसाठी गावची आठवण राहावी यासाठी 'लेक लाडकी माझ्या गावाची' या योजनेतून अकरा हजार रूपयेचे संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. - राजू मगदूम, सरपंच
माणगाव ग्रामपंचायतीचे मुलींसाठी योजना
मुलगी जन्मली की तिच्या नावे 3000 रू कन्यारत्न ठेव योजना
विवाह प्रसंगी 3000 रू पैठणी साडी भेट
विवाह प्रसंगी 11000रू पर्यंत संसारउपयोगी साहित्य