Kolhapur News: विशाळगडाचा बुरुज पुन्हा ढासळला; शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 17:57 IST2023-06-28T17:54:52+5:302023-06-28T17:57:13+5:30
पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Kolhapur News: विशाळगडाचा बुरुज पुन्हा ढासळला; शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील दगडी बुरुज पुन्हा ढासळला. सध्या विशाळगडावर सुरु असलेल्या संततभार पाऊसामुळे हा बुरूज ढासळला. पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पायथ्यालगतच्या दरीवरील लोखंडी शिडीनजीकचा दगडी बुरूज अतिवृष्टीमुळे गत जुलै महिन्यात ढासळला होता.
विशाळगडावर दोन मार्गाने जाता येते. एक मार्ग लोखंडी शिडीचा, तर दुसरा शिवकालीन पायरी मार्ग आहे. शिडी मार्गानेच पर्यटक जातात. लोखंडी शिडीपासून अवघ्या काही अंतरावरील हा बुरूज पुन्हा ढासळला. पावसाळ्यापूर्वी शिवप्रेमींनी पुरातत्त्व विभागाकडे विशाळगडाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हा बुरुज पुन्हा ढासळला असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे.
राज्य शासनाने गड, किल्लेसंवर्धन मोहिमेंतर्गत विशाळगडासाठी निधी मंजूर केला होता. या निधीमधून गडावर डागडुजीसह अनेक कामे केली जाणार होती. बुरूज, तटबंदीतील झाडेझुडपे, गवत काढून तसेच जमिनीखाली गाडलेले दगड उत्खनन करून पूर्वेकडील चार बुरुजांची डागडुजी करण्यात आली. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने बुरूज ढासळू लागले आहेत.