एटीएम कार्डची अदलाबदल करुन घातला गंडा, बिहारी भामटा सोनुवर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल
By उद्धव गोडसे | Updated: April 30, 2024 14:16 IST2024-04-30T14:05:13+5:302024-04-30T14:16:39+5:30
कोल्हापूर : एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने हातचालाखी करून आणि एटीएम कार्डची आदलाबदल करून फसवणूक करणारा बिहारी भामटा सोनूकुमार ...

एटीएम कार्डची अदलाबदल करुन घातला गंडा, बिहारी भामटा सोनुवर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल
कोल्हापूर : एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने हातचालाखी करून आणि एटीएम कार्डची आदलाबदल करून फसवणूक करणारा बिहारी भामटा सोनूकुमार पचानंद सनगही (वय २८, रा. अमरपूर, बिहार) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
त्याने २२ मार्च रोजी अनिल गोपालराव सूर्यवंशी (वय ६४, रा. महाद्वार रोड, कोल्हापूर) यांची फसवणूक करून खात्यावरील एक लाख १० हजार रुपये लांबविले आहेत. आठवड्यापूर्वीच शाहूपुरीतील ट्रेझरी शाखेजवळील एटीएम सेंटरमध्ये एका व्यक्तीची फसवणूक करून त्याने दीड लाख रुपये लांबविले होते.
अनिल सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पेटाळा येथील एका एटीएम सेंटरमध्ये ते त्यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड बदलण्यासाठी गेले होते. पासवर्ड बदलण्याची प्रकिया विसरल्याने ते गोंधळले होते. त्याचवेळी एटीएम सेंटरमध्ये आलेल्या तरुणाने मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची आदलाबदल केली. त्यानंतर दोन दिवसांतच सूर्यवंशी यांच्या खात्यातून एक लाख १० हजार रुपये कमी झाले. मात्र, मोबाइलवरील मेसेज पाहिले नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला नाही.
आठवड्यापूर्वी शाहूपुरी येथील ट्रेझरी शाखेतील एटीएम सेंटरवर एटीएम कार्डची आदलाबदल करून झालेल्या फसवणुकीची बातमी त्यांच्या वाचनात आली. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन पासबूक भरून घेतल्यानंतर खात्यातील एक लाख १० हजार रुपये अज्ञाताने एटीएमद्वारे आणि ऑनलाइन खरेदीद्वारे काढल्याचे लक्षात आले. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताच संशयित भामटा हा शाहूपुरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी बिहारी भामटा सोनूकुमार याच्यावर गुन्हा दाखल केला.