सोलापूरच्या व्यक्तीचा कोल्हापुरात धिंगाणा, शिरला नाल्यातील जलवाहिनीत; अग्निशमन जवानांची धावपळ, मांत्रिकाला बोलविले, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:39 IST2025-11-06T13:39:06+5:302025-11-06T13:39:22+5:30
बाहेर काढण्यासाठी तासभर मोठी कसरत

सोलापूरच्या व्यक्तीचा कोल्हापुरात धिंगाणा, शिरला नाल्यातील जलवाहिनीत; अग्निशमन जवानांची धावपळ, मांत्रिकाला बोलविले, अन्..
कोल्हापूर : सोलापूरहून आलेल्या काही जणांपैकी एका व्यक्तीने बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास धिंगाणा घातल्याने महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. ही व्यक्ती अनपेक्षितपणे तावडे हॉटेल चौकाजवळील नाल्यातील जलवाहिनीमध्ये शिरल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी तासभर मोठी कसरत करावी लागली.
पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील काही व्यक्ती एका वाहनातून कोल्हापूरकडे येत होत्या. तावडे हॉटेलजवळ त्यांचे वाहन येताच त्यातील एका व्यक्तीने अचानक वाहनातून उडी मारली आणि रस्त्यावरून पळत सुटली. त्याने अंगावरील कपडे काढले, केवळ अंडरवेअरवर पळत सुटलेली ही व्यक्ती येथील एका ओढ्यात उतरली. पुढे ओढ्यातील जलवाहिनीत शिरली.
या व्यक्तीसोबत आलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, पण ती व्यक्ती जलवाहिनीत शिरल्याने त्यांचाही नाइलाज झाला.
हा गोंधळ पाहून रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांनी त्याची माहिती अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाची दोन वाहने, जवान तेथे पोहोचले. बॅटरीच्या उजेडात त्या व्यक्तीचा शोध घेतला. ती व्यक्ती साधारणपणे ५० ते ६० फूट आत जलवाहिनीत गेली होती. जवानांनी त्यास बाहेर येण्याची विनंती केली, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. जलवाहिनीतून पाणी वाहत असल्याने जवानांना आत जाणेही अशक्य होते.
मांत्रिकाने केली कमाल
जवानांचे प्रयत्न सुरू असतानाच सोबत आलेल्या व्यक्तींनी एका मांत्रिकाला बोलविले. अग्निशमन जवानांनी जलवाहिनीच्या दुसऱ्या बाजूला जाळी लावली. त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच मांत्रिकाने त्या व्यक्तीच्या दिशेने काही लिंबू फेकले. तेव्हा ती व्यक्ती हळूहळू बाहेर आली. या अघोरी प्रयत्नाने अग्निशमनचे जवानही चकीत झाले. पहाटे पावणेचार वाजता त्या व्यक्तीला घेऊन त्याचे सहकारी निघून गेले.