लॉजच्या खोलीत पुण्याच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, कोल्हापुरातील वाठार येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:06 IST2025-08-08T14:05:52+5:302025-08-08T14:06:06+5:30

नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

A person from Pune died suspiciously at a lodging in Vadgaon near Wathar Kolhapur | लॉजच्या खोलीत पुण्याच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, कोल्हापुरातील वाठार येथील प्रकार

लॉजच्या खोलीत पुण्याच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, कोल्हापुरातील वाठार येथील प्रकार

पेठवडगाव : वाठार तर्फ वडगाव येथील एका लॉजिंगमध्ये गुरुवारी सकाळी पुण्यातील एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख संतोष अरुण देशमुख (वय ४७, मूळ गाव काेतुल, ता. अकाेले, जि. अहिल्यानगर, सध्या रा. कोथरूड, पुणे) अशी झाली असून, त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

ही माहिती लॉजिंग व्यावसायिक महेश सुदाम मोहिते यांनी वर्दी दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक खालिक इनामदार, हवालदार गजानन घोडके, विजयकुमार तांबे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी संतोष देशमुख व सहकारी मदन प्रभाकर गाणगोटे (वय ५५, रा. माळवाडी, पुणे) हे दोघेजण लॉजमध्ये वास्तव्यास आले होते. ते नोकरीच्या शोधात वाठार येथे आले असल्याचे सांगण्यात आले. यातील देशमुख हे आजारी होते. दरम्यान, मदन गाणगोटे हे दररोज सकाळी बाहेर जात व रात्री परत येत असत. गुरुवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास गाणगोटे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन "देशमुख मृत असल्याचे" सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खोली उघडून पाहिली असता, देशमुख यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत्यूची माहिती देशमुख यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी त्यानुसार रात्री पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपास सर्व शक्यता लक्षात घेऊन सुरू आहे. तपास उपनिरीक्षक खालिक इनामदार करीत आहेत. देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

Web Title: A person from Pune died suspiciously at a lodging in Vadgaon near Wathar Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.