Kolhapur: दीड वर्षाची स्वामिनी.. खेळता, खेळता हरपली; पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:02 IST2025-05-20T19:02:39+5:302025-05-20T19:02:52+5:30

पाच महिन्यांपूर्वीच झाला वाढदिवस

A one and a half year old girl from Amshi tragically died after falling into a water hole | Kolhapur: दीड वर्षाची स्वामिनी.. खेळता, खेळता हरपली; पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्देवी मृत्यू

Kolhapur: दीड वर्षाची स्वामिनी.. खेळता, खेळता हरपली; पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्देवी मृत्यू

सांगरुळ : घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या आमशी (ता. करवीर) येथील स्वामिनी संतोष सातारे या दीड वर्षाच्या मुलीचा घराशेजारील पाण्याच्या खड्ड्यात पडून सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला. सातारे यांच्या चुलत भावाच्या घरातील धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी ही हदयद्रावक घटना घडली. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष सातारे यांच्या भावाचे आमशी गावच्या पश्चिमेला डोंगर भागात नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी या घराचा धार्मिक विधी हाेता. यावेळी घरातील सर्व नातेवाईक ‘स्वामिनी’ला घेऊन गेले होते. सर्वजण उंबरठा पूजनाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना ‘स्वामिनी’ खेळत खेळत घराच्या पाठीमागील बाजूस गेली आणि चार फूट पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. 

कार्यक्रम संपल्यानंतर आई, वडील स्वामिनी कोठे दिसत नाही, म्हणून शोध सुरू केला. ही माहिती नातेवाइकांनाही सांगितली. सर्वानी मिळून परिसरात शोध घेतला. काही वेळानंतर ती घराच्या मागील बाजूस खोदलेल्या खड्ड्यात पडल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यावेळी ‘स्वामिनी’ची ही अवस्था पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तिला तातडीने उपचारासाठी सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पण, पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अन.. डॉक्टरही गहिवरले!

दीड वर्षाची गोंडस ‘स्वामिनी’ला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले त्यावेळी, आई ‘सानिका’ यांच्या मांडीवर निपचित पडली होती. ते पाहून ‘सानिका’ यांनी फोडलेल्या हंबरड्याने तेथील डॉक्टरही गहिवरले.

एकुलती एक मुलगी

सातारे दाम्पत्यांना एकुलती एक मुलगी होती. ‘स्वामिनी’चे वडील शिरोली एम.आय.डी.सी. मध्ये कामगार आहेत. तर आई गृहिणी आहे, त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे.

पाच महिन्यांपूर्वीच झाला वाढदिवस

लाडक्या मुलीचा कुटुंबांनी सहा महिन्यांपूर्वीच वाढदिवस साजरा केला हाेता. त्याचे फोटो मोबाईलवर घेतले होते. वाढदिवसाची आठवण सांगून तिच्या आईने आक्रोश केला.

Web Title: A one and a half year old girl from Amshi tragically died after falling into a water hole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.