कोल्हापुरात दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरला बिबट्या... उडाला थरकाप, पोलिसांसह तिघांवर हल्ला; बघ्यांवर सौम्य लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:39 IST2025-11-12T12:37:23+5:302025-11-12T12:39:36+5:30
Leopard Attack News: कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल वूडलॅण्डमध्ये मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली.

कोल्हापुरात दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरला बिबट्या... उडाला थरकाप, पोलिसांसह तिघांवर हल्ला; बघ्यांवर सौम्य लाठीमार
कोल्हापूर - येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल वूडलॅण्डमध्ये मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्याने पोलिस, वनकर्मचाऱ्यासह हॉटेलच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि ‘महावितरण’च्या आवारातील ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला.
तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला ‘‘ट्रॅन्क्विलाईझर’’ गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले आहे. बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले. बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला.
बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपुरीचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले. त्यातील खोंदल यांना जास्त दुखापत झाली आहे.
चेंबर एका बाजूने बंद करून दुसऱ्या टोकाला बांधली जाळी
‘महावितरण’च्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये घुसल्यामुळे बिबट्या आतच लपून बसला होता. चेंबरच्या एकाबाजूला प्लायवूड टाकून ते बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाळी लावली. बिबट्याने हल्ल्याच्या तयारीत उसळी मारून जाळीच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीत अडकवले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी गनने प्राथमिक स्तरावरील भुलीचे इंजेक्शन देऊन ‘ट्रॅन्क्विलाईझ’ (बेशुद्ध) केले, त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरींजने दुसरे इंजेक्शन टोचण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध बिबट्याला उचलून पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्यानंतर वन्यजीव विभागाच्या उपचार केंद्रात चिखली येथे नेण्यात आले.
चार वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या
जेरबंद केलेला बिबट्या चार वर्षांचा नर असून, पूर्ण वाढ झालेला आहे. हल्ला केलेल्या जखमा पाहता, त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. जेरबंद केलेला बिबट्या चार वर्षाचा नर आहे. हल्ला केलेल्या जखमा पाहता, त्याच्या ताकदीचा अंदाज येतो. १० ते १५ फुटांचा अडथळा सहजपणे उडी मारून ओलांडत तो पुढे जात होता, यावरुन कमालीची चपळताही दिसून आली.