Kolhapur: उसाचा फड पेटवला, आगीत होरपळून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:33 IST2025-02-06T19:31:44+5:302025-02-06T19:33:12+5:30
शेतात लपून बसलेला बिबट्या पळून गेल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले

Kolhapur: उसाचा फड पेटवला, आगीत होरपळून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला
शिरोली : नागाव (ता. हातकणंगले) येथील गाडीवड परिसरात अमित चिंतामणी सोळंकुरे यांचे शेत आहे. मंगळवारी शेतातील आडसाली ऊस पेटवून तोड सुरू केली होती. यावेळी उसाचा फड पेटवला असता त्यामध्ये नवजात दोन-तीन दिवसांच्या बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाला. तर शेतात लपून बसलेला बिबट्या पळून गेल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतामध्ये शेतकरी गेले असता, बिबट्याच्या बछड्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वनविभाग व शिरोली पोलिसांना कळविले. त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून ताे बिबट्याचा बछडाच असल्याचे सांगितले. पशुधन अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करून त्याचे मुडशिंगी येथील शासकीय जागेत दहन केले.
यावेळी वनअधिकाऱ्यांनी या परिसरात दोन दिवस ड्रोनच्या साहाय्याने एक पथक कार्यरत ठेवून पाहणी करणार असल्याचे सांगितले. या बछड्याच्या शोधात बिबट्या रात्री येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्याने नागाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी वनपाल एम. एस. पोवार, आरएफओ रमेश कांबळे, पशुधन विकास अधिकारी अश्विनी बोगार्डे, वनरक्षक विकास घोलप, बचाव पथकाचे अमोल चव्हाण, नागावचे पोलिस पाटील बाबासो. पाटील उपस्थित होते.