कोल्हापुरातील गडहिंग्लजचा जवान ‘पळपुटा’ घोषित, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:17 IST2023-02-25T14:17:23+5:302023-02-25T14:17:50+5:30
समितीच्या निकषांनुसार त्याला पळपुटा घोषित करण्यात आले आहे.

कोल्हापुरातील गडहिंग्लजचा जवान ‘पळपुटा’ घोषित, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या
गडहिंग्लज : भारत-तिबेट सीमा पोलिस बलाने जिल्ह्यातील पोलिस शिपायाला शुक्रवारी (२४) पळपुटा घोषित केले. विजय गोविंद मांगले (रा. नरेवाडी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. १५ दिवसांत ‘लेह’ येथे कर्तव्यावर हजर न राहिल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा त्याला देण्यात आला आहे. वरिष्ठांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी, मांगले हे १९ सप्टेंबर २०२२ पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे वेळोवेळी तीन नोटिसा बजावण्यात आल्या. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने अटक वॉरंटही काढण्यात आला होता. दरम्यान, महिन्यापेक्षा अधिक काळ परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यामुळे न्यायिक तपास समितीकडून त्याच्या गैरहजेरीची कारणमीमांसा करण्यात आली. त्यानंतर समितीच्या निकषांनुसार त्याला पळपुटा घोषित करण्यात आले आहे.
बडतर्फचा इशारा
शुक्रवारी (२४) वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या नोटिसीनंतर १५ दिवसांत ५ वी वाहिनी भारत-तिबेट सीमा पोलिस बल लेह येथे हजर न झाल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशाराही नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.