Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सचा तब्बल ८०० कोटींचा गंडा; फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट
By उद्धव गोडसे | Updated: July 14, 2025 13:35 IST2025-07-14T13:34:58+5:302025-07-14T13:35:20+5:30
एकूण गुंतवणूक, किती कोटींचे दिले परतावे.. वाचा सविस्तर

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सचा तब्बल ८०० कोटींचा गंडा; फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट
उद्धव गोडसे
कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीने सुमारे पाच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट झाले. कंपनीच्या कागदपत्रांची आणि संगणकीय पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली असून, अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांकडे सादर केला.
कंपनीने एकूण २४७६ कोटींची गुंतवणूक घेऊन त्यावर १६०० कोटींचे परतावे दिल्याचेही तपासातून समोर आले. फॉरेन्सिक अहवालामुळे तपासाला आणखी गती येणार असून, तक्रारी दिलेल्या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वाढली आहे.
एएस ट्रेडर्स कंपनीसह तिच्या संलग्न कंपन्या, संचालक आणि एजंट यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या व्याप्तीसह पद्धत समजून घेण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय घेतला होता. त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून फॉरेन्सिक तपासणीची मंजुरी घेतली. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली.
गेल्या दीड वर्षांपासून मुंबईतील तज्ज्ञांकडून गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू होते. याचा अहवाल नुकताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाला. या अहवालानुसार कंपनीने डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे पाच हजारांहून जास्त गुंतवणूकदारांकडून २,४७६ कोटी रुपये जमा करून घेतले. यातील १,६०० कोटी रुपये परताव्यांच्या रूपाने परत दिले. ८०० कोटी रुपये हडप करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
फॉरेन्सिक ऑडिटमधील निष्कर्ष
- एकूण गुंतवणूकदार : ५ हजार
- एकूण गुंतवणूक : २,४७६ कोटी
- दिलेले परतावे : १,६०० कोटी
- झालेली फसवणूक : ८०० कोटी
- गुंतवणूकदारांच्या तक्रारी : ५९५