कोल्हापुरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल होणार, नितीन गडकरी यांचे डिझाइनसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:28 IST2025-02-18T12:27:45+5:302025-02-18T12:28:17+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल या भक्कम (इलिव्हेटेड) उड्डाणपूल तत्त्वत: मंजूर ...

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल या भक्कम (इलिव्हेटेड) उड्डाणपूल तत्त्वत: मंजूर झाला आहे. त्याचे अंदाजपत्रकाचे काम सुरू असून डिझाइनसह प्रस्ताव तातडीने द्या असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत सोमवारी दिले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री गडकरी यांनी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनीही न्यू पॅलेसवरीव भेटीत तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.
कोल्हापूर शहरात सध्या प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल करण्याचा प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी देऊन त्याचे अंदाजपत्रक करण्याच्या सूचना विभागास दिल्या आहेत. या उड्डाणपुलासाठीची यूटीलिटी व जागेचा खर्च महापालिका व राज्यसरकारने करावा. प्रकल्प खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करेल असे मंत्री गडकरी यांनी सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस., राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, सी. बी. भराडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
केर्ली फाटा रस्त्याची उंची वाढवणार
महापुरावेळी शिवाजी पूल ते केर्ली फाटा हा रस्ता नेहमी पाण्याखाली जातो. त्यामुळे या रस्त्याची उंची वाढवण्याबरोबरच पाणी जाण्यासाठी सहा ठिकाणी बॉक्स तयार करण्यात येणार असून याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या.
बालिंगा ते आंबेवाडी होणार रस्ता
गगनबावड्याहून कोल्हापुरात येणारी वाहतूक कमी करण्यासाठी बालिंगा ते आंबेवाडी या रस्त्यालाही मंत्री गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला. या रस्त्याचे सर्व्हे करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. ज्यामुळे गगनबावड्याहूून आलेली वाहने परस्पर रत्नागिरी रोडला जातील.
कागल-सातारासाठी डिसेंबरची डेडलाइन
कागल-सातारा महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत तर कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइनच गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली.
सांगली फाटा ते उचगाव पिलर पूल
सांगली फाटा ते उचगाव हा सव्वा चार किलोमीटरचा पिलर पूल व कागल शहरातील १.२ किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले. या पिलर पुलासोबत बास्केट ब्रिजची उंची वाढवून त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, आजरा, गडहिंग्लज शहराभोवती रिंगरोड करण्याची मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्याला गडकरी यांनी सहमती दर्शवली.
पैजारवाडी ते चौकाकमध्ये १७ किलोमीटर सेवामार्ग
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा ते पैजारवाडी या सात किमी सेवामार्गाला गडकरी यांनी मान्यता दिली. यात पाच भुयारी मार्ग असतील. पैजारवाडी ते चौकाक हा १७ किमी सेवामार्ग करण्यात येणार असून यामध्येही पाच भुयारी मार्ग करण्यासाठी गडकरी यांनी सहमती दर्शविली.
पन्हाळा ते कोल्हापूर चारपदरी करा..
बैठकीपूर्वी मंत्री गडकरी यांनी न्यू पॅलेसला भेट दिली. तिथे खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, समरजित घाटगे, व्ही. बी. पाटील, आनंद माने आदींनी त्यांच्याशी कोल्हापुरातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. कोल्हापूर ते पन्हाळा या रस्त्यावरून वाहन चालवणे मुश्कील आहे. म्हणून हा रस्ता चारपदरी करण्यात यावा असा आग्रह सर्वांनी धरला. त्यास मंत्री गडकरी यांनी संमती दिली. समरजित घाटगे यांनी मांगूर पुलाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.