कोल्हापूर : शाहूपुरीतील दुस-या गल्लीत लकी कृषी सेवा केंद्रात सोमवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या घटनेत कृषी सेवा केंद्राचा फलक आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास लकी कृषी सेवा केंद्राच्या फलकाच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. काही क्षणातच कृषी सेवा केंद्राच्या फलकाला आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशामक दलास कळवली. अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एका मदत पथकाने घटनास्थळी पोहोचून १५ ते २० मिनिटात आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला. या घटनेत दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. या परिसरात एकमेकांना लागून दुकाने आहेत. वेळीच आग विझवण्यात यश आल्यामुळे इतर दुकानांमध्ये आग भडकण्याचा धोका टळला.
कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला
By उद्धव गोडसे | Updated: April 10, 2023 17:34 IST