Kolhapur- ऑफिसमधील विषय बारमध्ये काढला, दोन मित्रांमध्ये राडा झाला
By उद्धव गोडसे | Updated: November 7, 2023 13:50 IST2023-11-07T13:49:09+5:302023-11-07T13:50:07+5:30
करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Kolhapur- ऑफिसमधील विषय बारमध्ये काढला, दोन मित्रांमध्ये राडा झाला
कोल्हापूर : बिअर बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या मित्रांमध्ये एकाने ऑफिसमधील विषय काढला. याचा राग आल्याने दारूच्या नशेतील मित्राने दुस-या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. ५) रात्री आठच्या सुमारास जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये घडला.
याबाबत महेंद्र मोहन चौगुले (वय ३५, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, करण रावण (रा. दिलबहार तालीमजवळ, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र चौगुले आणि करण रावण हे दोघे मित्र असून, शहरातील एका कुरिअर कंपनीत नोकरी करतात. रविवारी रात्री हे दोघे जरगनगर येथील एका बिअर बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले. दारू पित असताना चौगुले याने ऑफिसमधील विषय काढला. 'बारमध्ये बसल्यावर ऑफिसमधील विषय का काढलास? आता तुला बघून घेतो,' असे म्हणत करण रागाने निघून गेला.
त्यानंतर अर्ध्या तासाने परत येऊन त्याने शिवीगाळ करीत चौगुले याला मारहाण केली. झटापटीत ढकलून दिल्याने चौगुले याच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला आणि कपाळावर जखम झाली. चौगुले याने सीपीआरमध्ये उपचार घेऊन करण याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.