कोल्हापुरात एका कुटुंबाने एक-दोन नव्हे ४० मांजरे पाळली, शेजारी त्रस्त; कारवाईदरम्यान एका कर्मचाऱ्याला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:02 IST2025-06-12T12:01:57+5:302025-06-12T12:02:51+5:30

महापालिकेकडून मांजरे जप्त, दोन ट्रॉली कचरा काढला, वादावादीमुळे तणाव

A family in Kolhapur kept not one or two but 40 cats, neighbors are worried During the action an employee was bitten | कोल्हापुरात एका कुटुंबाने एक-दोन नव्हे ४० मांजरे पाळली, शेजारी त्रस्त; कारवाईदरम्यान एका कर्मचाऱ्याला चावा

कोल्हापुरात एका कुटुंबाने एक-दोन नव्हे ४० मांजरे पाळली, शेजारी त्रस्त; कारवाईदरम्यान एका कर्मचाऱ्याला चावा

कोल्हापूर : रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले, त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी नियमबाह्यपणे पाळलेली तीन मांजरे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी जप्त केली. मांजरे पाळून स्वच्छता न केल्याने साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी एका मांजराने महापालिका कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेचा आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.

महापालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलबुले यांना मांजरे पाळण्याची आवड आहे. त्यांच्याकडे पूर्वी ३५ पेक्षा अधिक मांजरे होती. मात्र, अलीकडे ती कमी कमी होत दहा ते बारा राहिली होती. घरात मांजरांना रोज घातलेल्या खाद्याचे अवशेष, त्यांचे मल, मूत्र, घरगुती दैनंदिन कचरा अनेक दिवसांपासून घरात साठून राहिल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. याचा त्रास झाल्याने रहिवाशांनी पहिल्यांदा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तेथून तक्रार महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने बुलबुले यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी घरातील स्वच्छता ठेवली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पथक घरात पोहोचले. घरात जाऊन कचरा भरताना आणि मांजरे पकडताना विरोध झाला. यामुळे कर्मचारी आणि बुलबुले कुटुंबीय यांच्यात वाद झाला. यातूनही तीन मांजरे पकडून ती जप्त केली. उर्वरित मांजरे पळून गेल्यामुळे जप्त करता आली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सूरज घुणकीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त मांजराचे पुढे काय ?

जप्त केलेली तीन मांजरे महापालिकेच्या कुत्रे निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आली आहेत. बुलबुले कुटुंब सर्व नियम पाळून मांजरे पाळण्याची हमी दिली तर जप्त तीन मांजरे त्यांना परत करण्यात येणार आहेत.

Web Title: A family in Kolhapur kept not one or two but 40 cats, neighbors are worried During the action an employee was bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.