Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही
By उद्धव गोडसे | Updated: September 25, 2025 17:47 IST2025-09-25T17:45:25+5:302025-09-25T17:47:12+5:30
एम.कॉम. पास असलेला मयांक पटेल याने काही कंपन्यांना औषधे विकल्याचे कागदोपत्री दाखवले

Kolhapur: औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दाखवली सिमेंटची विक्री, कर व्यवस्थापकाची बनावटगिरी सीएनाही सापडली नाही
उद्धव गोडसे
कोल्हापूर : औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्य प्रसाधनांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या वेलनेस हेल्थटेक कंपनीने कागदपत्रांमध्ये फेरफार करून सिमेंट विक्री केल्याचे दाखवले. एम. कॉम. पास असलेला कर व्यवस्थापक मयांक मुकेश पटेल (वय ३९, रा. डोंबिवली पश्चिम, ठाणे) याने केलेली बनावटगिरी कंपनीतील ऑडिट रिपोर्टमध्ये आली नाही. मात्र, केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याची पोलखोल केली. यात कंपनीसह आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचा तपास सुरू आहे.
केंद्रीय जीएसटीच्या विशेष गुप्तचर पथकाने केलेल्या कारवाईत विक्रोळी येथील वेलनेस हेल्थटेक कंपनीने २१ कोटींचा कर चुकविल्याचे उघडकीस आले. कंपनीच्या कर व्यवस्थापकानेच कंपनीसह सरकारला गंडा घातला आहे.
वाचा- कंपनीच्या कर व्यवस्थापकाने चुकवला २१ कोटींचा जीएसटी, मुंबईतील मयांक पटेल यांना अटक
एम.कॉम. पास असलेला मयांक पटेल याने काही कंपन्यांना औषधे विकल्याचे कागदोपत्री दाखवले. त्यातील काही औषधे खराब असल्याने ती परत घेतल्याचे दाखवले. त्यातून तयार झालेल्या बिलांवर जीएसटी रिटर्न वसूल केला. विशेष म्हणजे औषध विक्री करणाऱ्या कंपनीने सिमेंटचीही विक्री केल्याचे दाखवले.
कंपनीला थांगपत्ताच नाही?
वेलनेस हेल्थटेक ही औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणारी देशातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीकडे कर व्यवस्थापन, आर्थिक व्यवहारांची तपासणी करणारी तज्ज्ञ सीएंची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. तरीही २१ कोटींचा कर चुकविल्याचे कंपनीला कसे समजले नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान मयांक पटेल याने कंपनीला अंधारात ठेवून त्याने स्वत:च्या सहा कंपन्या सुरू केल्याचे उघडकीस आले. कर चुकवेगिरी केल्याची कबुली त्याने विशेष गुप्तचर अधिकाऱ्यांकडे दिली आहे.
मयांक पटेल याने प्रत्यक्ष वस्तूंचा पुरवठा न करता बनावट पुरवठा दाखवला. तेवढ्याच किमतीचा त्रुटीयुक्त पुरवठा दाखवून बिले तयार केली. असे प्रकार टाळण्यासाठी कंपन्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. - अभिजित विजयकुमार भिसे - वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, केंद्रीय जीएसटी विभाग, कोल्हापूर